नोकरीत असताना अपंगत्व आले तरी आरक्षणचा लाभ मिळेल का?

Supreme Court
  • सुप्रीम कोर्ट तपासणार कायद्याचा नवा मुद्दा

नवी दिल्ली : एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत लागताना अपंगांच्या राखीव कोट्यातून आलेली नसेल पण तिला नोकरीत असताना अपंगत्व आले तर अशी व्यक्ती बढतीमध्ये अपंगांच्या आरक्षणाचा लाभ गेऊ शकते का, असा कायद्याचा नवा मुद्दा उपस्थित झाला असून तो तपासून पाहण्यास सर्वोच्च न्यायालय राजी झाले आहे.

केरळ सरकारने केलेल्या अपिलाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. अशा व्यक्तीचा बढतीच्या वेळी अपंगांच्या राखीव कोट्यातून विचार करणे सर्वसाधारण प्रवर्गातील अन्य पात्र कर्मचाºयांवर अन्याय करणारे होईल, असे केरळ सरकारचे म्हणणे आहे. आता सेवेतून निवृत्त झालेल्या लिसम्मा जोसेफ या महिला कर्मचाºयाच्या प्रकरणात केरळ सरकारने हे अपील केले आहे. लिसम्मा यांना अशी बढती दिल्यास द्याव्या लागणाºया जास्तीच्या वित्तीय लाभाचाच प्रश्न असल्याने आम्ही व्यक्तिगत निकालात हस्तक्षेप करणार नाही. पण या निमित्ताने उपस्थित झालेला फक्त कायद्याचा मुद्दा तपासू असे न्या. संजय कृष्ण कौल, न्या. दिनेश महेश्वरी व न्या. हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. या कामी मदत करण्यासाठी खंडपीठाने अ‍ॅड. गौरव अग्रवाल यांची ‘अ‍ॅमायकस क्युरी’म्हणून नियुक्ती केली.

पतीच्या निधनानंतर लिसम्मा यांना अनुकंपा तत्त्वावर केरळ सरकारने नोकरी दिली. त्यावेळी त्या अपंग नव्हत्या व नंतर अपघातामुळे त्यांना अपंगत्व आले. पुढील टप्प्याच्या बढतीच्या वेळी लिसम्मा यांनी त्या पदासाठी आपला अपंगांच्या राखीव कोट्यातून विचार करावा, अशी मागणी केली. ती अमान्य झाल्यावर त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली, पण त्यांची याचिका तेथे फेटाळली गेली. अपिलात केरळ उच्च न्यायालयाने मात्र लिसम्मा यांच्या बाजूने निकाल दिला. लिसम्मा यांची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन अन्य अपंग उमेदवारांसोबत त्यांचाही बढतीसाठी विचार करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्याच्याविरुद्ध केरळ सरकार सवोच्च न्यायालयात आले आहे.

उच्च न्यायालयाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या सिद्धराजू वि, कर्नाटक सरकार या प्रकरणातील निकालाचा आधार घेतला होता. पण तो निकाल अपंगांचे आरक्षण बढत्यांनाही लागू होते, एवढ्यापुरताच होता. आता उपस्थित झालेला प्रश्न त्यापुढील म्हणजे मुळात नोकरीस लागताना अपंग नसलेल्या पण नंतर अपंगत्व आलेल्या कर्मचाºयास बढतीमध्ये आरक्षण मागता येईल का, असा आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER