गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

Sharad Pawar - Anil Deshmukh - Devendra Fadnavis - Maharashtra Today

नागपूर : दिल्लीत राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पत्रकार परिषद घेऊन थेट पवारांनाच सवाल केले आहेत.

शरद पवार यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. या प्रकरणात केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार की गृहमंत्र्यांचीही चौकशी होणार आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जोपर्यंत देशमुख यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

ज्युलिओ रिबेरो चांगले अधिकारी आहेत. हे हुशार आहेत. पण अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी रँकचे अधिकारी गृहमंत्र्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल करतानाच केवळ परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे की देशमुख यांचीही चौकशी होणार आहे, त्याचा खुलासा पवारांनी करावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे गृहमंत्री आहेत. ते पदावर असेपर्यंत त्यांची चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करण्यात यावी. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER