सत्तेचा ‘मटका’ लागल्यानंतर डान्सबारही सुरू करणार का? ठाकरे सरकारला भाजपाचा टोमणा

Atul Bhatkalkar & Uddhav Thackeray

मुंबई : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात दारूचा महसूल फळल्यानंतर ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार आता ई-बेटिंग नियमित करण्याचा विचार करते आहे. सत्तेचा मटका लागल्यानंतर जुगारावर प्रेम जडणे स्वाभाविक नाही का? त्यामुळे येत्या काही काळात राज्याचा महसूल व रोजगार वाढवण्यासाठी डान्सबार सुरू करण्याचा विचार आहे का? असा टोमणा भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. सध्या आयपीएल सुरु झाले आहे. त्यात राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करुन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ई-बेटिंग अधिकृत करणे कितीपत योग्य आहे, यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता, असा गौप्यस्फोट आमदार भातखळकर यांनी केला आहे. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच ई-बेटिंग अधिकृत करणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारने दिले आहेत. राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारने याचा विसर पडू देऊ नये, असे भातखळकर यांनी सरकारला म्हटले आहे.

राज्यात अमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे सोडून सरकार आता पैशांसाठी जुगार अड्डे अधिकृत सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाच्या तरी हट्टापायी ‘नाईट लाईफ’ सुरु करुन मुंबईतील तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे पाप या सरकारने या पूर्वीच केले आहे, अशी टीका त्यांनी केली. .

राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते, अशी टीका भातखळकर यांनी महाविकासआघाडीवर केली. पैशांसाठी ठाकरे सरकार पुढील काही दिवसांमध्ये डान्स बारही सुरु करेल, असा टोमणा त्यानी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER