दिलेला शब्द असाच पुढेही पाळत राहणार !- आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

सोलापूर : गेल्या २५ वर्षांपासून नेते, मंत्री येत-जात होते. संघर्ष समिती सतत निवेदन देत होती. मलाही फेब्रुवारीत संघर्ष समितीने निवेदन दिले. परंतु, हे असेच किती वर्षे चालणार? म्हणून तत्काळ शिवतारे बापूंना ते निवेदन पाठवले आणि चार दिवसांत प्रकल्पाचे डिझाईन, टेंडर तयार होऊन दोन हजार एकर शेतीला पाणी देणारा प्रकल्प मार्गी लागला. मधल्या काळात आचारसंहिता असल्यामुळे आता हे भूमिपूजन होतेय. आम्ही दिलेला शब्द असाच पाळत राहणार, यापुढेही पाळणार, असे विश्वास ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच पोखरापूर येथील तलावात सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जनआशीर्वाद दौरा सुरू करतोय, असे म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या शेतकऱयांना काही त्रास असेल, तर त्यांनी वेडावाकडा विचार न करता शिवसेनेचा विचार मनात आणावा. शिवसेना मदतीसाठी धावून येईल.

यावेळी शिवसेना उपनेते, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक जिल्हा परिषद सदस्या, शैला गोडसे आदी उपस्थित होते.