जोकोवीचला ‘त्या’ पराभवासाठी दंड होणार का?

Novak Djokovic

व्हिएन्ना (Vienna) टेनिस (Tennis) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोवीचचा (Novak Djokovic) लकी लूझर खेळाडू लोरेन्झो सोनेगोकडून (Laurenzo Sonego) पराभव हा जेवढा अनपेक्षित तेवढाच आश्चर्यजनक होता. जोकोने हा सामना कोणत्याही संघर्षाविना २-६, १-६ असा गमावला आणि त्यानंतर हरलो तरी काही फरक पडत नाही; कारण मी जे उद्दिष्ट घेऊन या स्पर्धेत आलो होतो ते वर्षअखेर नंबर वन कायम राहण्याचे ध्येय साध्य झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे लोरेन्झो हा सामना ‘जिंकला’ की जोकोवीच सामना ‘हरला’ याची चर्चा सुरू  झाली आहे.

व्यावसायिक टेनिसमध्ये खेळाडूंनी फारसे प्रयत्न न करता सामने गमावण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. याला टेनिसच्या भाषेत टँकिंग असे म्हणतात. असोसिएशन आॕफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) या पुरुषांच्या टेनिसचे नियंत्रण करणाऱ्या संस्थेने ‘टँकिंग’ हा शिक्षापात्र गुन्हा ठरवला आहे. आणि नोव्हाक जोकोवीच हा अतिशय सफल आणि आघाडीचा तसेच नंबर वन खेळाडू असला तरी त्याचे असे बरेच सामने संशयास्पद आहेत. सोनेगो या क्रमवारीतील ४२ व्या क्रमांकाच्या आणि पात्रता फेरीसुद्धा पार न करू शकलेल्या खेळाडूला जोको सहज मात देईल अशी अपेक्षा होती; पण झाले उलटेच. संपूर्ण सामन्यात जगातील नंबर वन खेळाडू केवळ तीन गेम जिंकू शकला आणि सहा सहा ब्रेक पॉइंटचा फायदा उचलू शकला नाही हे सारेच संशयास्पद होते. सामन्यात काही वेळा तर जोकोवीच रिटर्नस् मारण्याचा प्रयत्न करतानाच दिसला नाही आणि काही वेळा तर प्रतिस्पर्धी सर्व्हिस करत असताना तो भलत्याच दिशेला जाताना दिसला. सामन्याच्या शेवटच्या गेममध्ये तर जणू जोकोला चेंडू नेटमध्येच टाकायचा होता, पलीकडे नाही असे दिसले.

यामुळे जोकोवीचने हा सामना टँक केला का, अशी शंका उपस्थित झाली. हे सिद्ध  करणे कठीण आहे; पण शारीरिकदृष्ट्या जो खेळाडू तंदुरुस्त असूनही त्याच्याकडून सामन्यात पुरेसे प्रयत्न दिसत नाहीत त्याला टँकिंग म्हणतात. सोनेगोविरुद्ध  जोकोला कोणतीही अशी समस्या नव्हती. सामन्यात संघर्ष न करणाऱ्या, प्रयत्नच न करणाऱ्या खेळाडूला २० हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो. याचे अधिकारी चेअर अम्पायर किंवा सुपरवायजर असतात. एकूणच स्पर्धेवर याचा परिणाम होणार असेल तर एटीपीच्या नियम व स्पर्धा समितीकडे ही प्रकरणे सोपविली जातात आणि ते चौकशीअंती खेळाडू दोषी आढळला तर त्याची बक्षीस रक्कम रोखू शकतात.

प्रेक्षकांशी प्रतारणा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ही शिक्षेची तरतूद आहे. सामने बघायला पैसा व वेळ खर्च करून आलेले प्रेक्षक असे नीरस व एकतर्फी सामने बघायला आलेले नसतात. असे सामने म्हणजे प्रेक्षकांची एकप्रकारे फसवणूकच असते. दुसरी बाब म्हणजे सट्टेबाजीचीही शंका असते आणि त्यात वरच्या क्रमांकाच्या खेळाडूला अधिक फायदा सट्टेबाजांकडून होण्याची शक्यता असते.

जोकोवीचच्या काही सामन्यांबद्दल यापूर्वीसुद्धा अशा शंका उपस्थित झाल्या आहेत. २०१७ च्या फ्रेंच ओपनमध्ये डाॕमिनीक थीमकडून त्याचा पराभव असाच संशयास्पद होता. या सामन्यात जोकोवीच ६-७, ३-६ असा मागे होता. त्यानंतर त्याने तिसरा सेट एकही गेम न जिंकता ०-६ असा गमावला. त्यावेळी जाॕन मॕकेन्रो, जीम कुरियर व ग्रेग रुसेदस्की अशा खेळाडूंनी जोकोवर टीका केली होती. मॕकेन्रोने तर म्हटले होते की, जोकोवीचची मैदानावर थांबायचीच इच्छा दिसत नाही. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जोकोवीच याबद्दल काहीच बोलला नव्हता आणि पहिल्या सेटमध्ये गमावलेले काही सेटपाॕईंटला त्याने दोष दिला होता.

२००७ मध्ये पॕरिस मास्टर्सचा फॕब्रिस सांतारोविरुद्धचा सामनाही असाच संशयास्पद होता. दुसऱ्या फेरीचा तो सामना जोकोवीचने ३-६, २-६ असा गमावला होता. या सामन्यावेळी आपण दातदुखीने त्रस्त होतो असा बहाणा जोकोने केला होता.

२०१६ च्या एटीपी फायनल्समध्ये अँडी मरेकडून जोको ३-६, ४-६ हरला. हा निकाल व्यवस्थित वाटत असला तरी जोकोचा त्या सामन्यातील खेळ यथातथाच होता. संपूर्ण सामन्यात जोकोवीच केवळ एकच ब्रेकपाॕईंट मिळवू शकला होता. या सामन्याच्या आधीचे सामने मात्र जोकोवीचने प्रभावीपणे जिंकले होते.

२०१८ च्या एटीपी फायनल्समध्ये अॕलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध च्या सामन्यातही जोकोवीच निरुत्साही दिसला होता. या सामन्याच्या आधीचे चारही सामने जोकोवीचने सेट न गमावता आणि एकदाही सर्व्हिस न गमावता जिंकले होते. झ्वेरेवलाच आधीच्या सामन्यात त्याने ६-४, ६-१ अशी मातसुद्धा  दिली होती. मात्र फायनलचा सामना जोकोवीचने ४-६, ३-६ असा गमावला होता.

आणि असे संशयास्पद सामने खेळणारा जोकोवीच एकटाच नाही तर निक किरयोस, बेनोट पेयरे, बर्नार्ड टाॕमीक व गेल मोनफिल्स यांच्या सामन्यांवरही अशा शंका उपस्थित झाल्या होत्या. यापैकी काहींना दंडसुद्धा झाला आहे. राॕजर फेडररलाही १९९८ मध्ये अशा सामन्यासाठी दंड झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER