चीन हल्ला करील?

badgeसारा देश करोनाशी (Corona) लढण्यात गुंतलेला आहे. त्यामुळे राजकीय आघाडीवर शांतता आहे. बिहारची निवडणूक पुढच्या महिन्यात होत आहे. त्यामुळे तिथे थोडे राजकारण तापायला सुरुवात झालेली दिसते. ‘व्यर्थ न जाने देंगे ये बलिदान’ म्हणत अभिनेता सुशांतसिंहचे (SushantSingh) पोस्टर छापून भाजपने (BJP) तिथल्या निवडणुकीची तयारी चालवली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मैत्रीण रियाच्या भानगडी सोडल्या तर टीव्हीवर बातम्याच दिसत नाहीत. कोरोना संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होत असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन भरत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशनही आजपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या सावटात होणारी ही दोन्ही अधिवेशने वेगळ्याच कारणांनी गाजतील असे संकेत मिळत आहेत.

भारत-चीन सीमेवर (India-china Border) गेली काही महिने तणावाचे वातावरण आहे. १५ जूनच्या रक्तरंजित चकमकीनंतर भारताने बंदोबस्त वाढवला आहे. दोन्ही देशांनी आपापले सैन्य आमनेसामने उभे केले आहे. भारताने कधी नव्हे तो आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘हा मोदींचा भारत आहे’ (Ha Modi cha Bharat Aahe) याचा अनुभव जग घेत आहे. आपणही प्रतिहल्ला करू शकतो हे भारताने दाखवून दिल्याने सीमेवर तणाव आहे. दोन्ही देश वाटाघाटीच्या टेबलावर असले तरी काहीही घडू शकते. साधी ठिणगी उडाली तरी युद्ध भडकू शकते. येत्या दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधून चीन हल्ला करू शकतो. युद्ध पेटले तर ते दोन देशांतले राहणार नाही.

अमेरिका भारताच्या बाजूने उडी घेईल. ट्रम्प (Trump) यांना चीनला (China) धडा शिकवायची खुन्नस आहे. रशिया कसा वागतो त्याकडे जगाचे लक्ष राहील. संधी साधून पाकिस्तान काश्मीरवर हल्ला चढवू शकतो. तसे झाले तर दोनदोन आघाड्यांवर लढताना आपल्या सैन्याचा कस लागेल. युद्ध मोठे झाले तर त्याला तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे स्वरूप येऊ शकते. ती भीती टाळण्यासाठी लहानसहान चकमकीवर निभवले जाईल असेही होऊ शकते. अधिवेशन म्हटले की, सत्ताधारी टेन्शनमध्ये येतात. यावेळीही विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करील. पण कोरोनाच्या सावटात होणाऱ्या या अधिवेशनात आमदार-खासदारांना मर्यादा आल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रश्नोत्तराचा तास नाही. त्यामुळे सरकारला फाडून खाण्याची संधी कमी आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात तर पुरवणी मागण्या, सरकारी विधेयके असे सरकारी कामकाजच मुख्यत्वे आहे. कोरोनाने सरकारचे पंख छाटले आहेत. अर्थव्यवस्था पार लंबी झाल्याने सरकारी खजिन्यात ठणठणाट आहे. विकासाची कामे दूर राहिली, कर्मचाऱ्यांचे पगार करताना सरकारच्या तोंडाला फेस येतो आहे. पाच महिन्यांपासून कोरोना मुक्कामाला आहे. वारंवार सांगूनही लोक तोंडाला मास्क बांधत नाहीत, गर्दी टाळत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढतो आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सारखा फुगतो आहे.

रुग्णालयांमध्ये बेड आणि इतर व्यवस्था करताना यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. अशा हवेतही मंदिरे, मेट्रो खुली करण्यासाठी लोकांचा दबाव आहे. अशा वेळी नेमके व्यवस्थापन करताना तीन चाकांच्या उद्धव सरकारची दमछाक सुरू आहे. नागपूरसारख्या शहरात दररोज ३०-४० लोक मरत आहेत. पण माणसांच्या जीवाचे मोल आता मागे पडत चाललेले दिसते. कसेही करून हळूहळू अर्थव्यवस्था अनलॉक (Unlock) करण्याच्या दिशेने सरकारची पावले पडताना दिसत आहेत.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER