बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना सवाल

Yogi Adityanath-Gulabrao Patil

मुंबई :- उत्तर प्रदेशात मुंबईच्या तोडीस तोड फिल्ससिटी उभारण्याचे स्वप्न उराशी घेऊन चाचपणीसाठी मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. मग कलाकार उत्तर प्रदेशात जाऊन काय डाकू बनणार आहेत का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपस्थित केला. (Shivsena leader Gulabrao Patil slams UP CM Yogi Adityanath)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या तुलनेत मुंबई सुरक्षित असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात सुरक्षितता आहे का? उत्तरप्रदेशात दिवसाढवळ्या बँकेत दरोडे पडतात. मग तिथे गुंतवणूक करणे कितपत उचित आहे? त्यामुळे बॉलिवूड (Bollywood) उत्तर प्रदेशात जाणार का, याबाबत माझ्या मनात साशंकता असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपण मुंबईत काही हिसकावून घेण्यासाठी आलो नसल्याचे स्पष्ट केले. बॉलिवूड इंडस्ट्री (Bollywood) मुंबईबाहेर नेणं म्हणजे एखाद्याच्या खिशातलं पाकीट मारण्याइतकी सोपी गोष्ट आहे का, असा मिश्किल सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांना विचारला.

ही बातमी पण वाचा : चित्रपटनगरी कोणाचे पॉकेट नाही, बॉलिवूड मुंबईतच राहिल; योगींची ग्वाही

आम्हाला कोणाचीही गुंतवणूक पळवायची नाही किंवा कोणाच्याही विकासात अडथळा आणायचा नाही. आम्ही काहीही न्यायला आलेलो नाही. आम्हाला उत्तर प्रदेशात स्वतंत्र व्यवस्था उभारायची आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं सांगतानाच बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

उत्तर प्रदेशात आम्हाला वर्ल्ड क्लास फिल्मसिटी निर्माण करायची आहे. म्हणून व्यक्तिगतरित्या मी अनेकांना भेटलो. काहींशी सामूहिकपणेही चर्चा केली. फिल्मी दुनियेकडूनही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER