
दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. त्याच वेळी हरियाणातील शेतकऱ्यांच्या २९ संघटनांच्या शिष्टमंडळाने या कायद्यांना समर्थन दिले आहे व हे कायदे रद्द केले तर आंदोलन करू, असा इशारा दिला.
भारतीय किसान युनियनचे नेते गुणी प्रकाश (Guni Prakash) यांच्या नेतृत्वाखाली या २९ संघटनांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची शनिवारी भेट घेऊन केंद्राने केलेल्या कायद्यांना समर्थन देण्याचे पत्र दिले. सरकारने नवीन कृषी कायदे रद्द केले तर आम्ही आंदोलन करू. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्हालाही आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन करू.
आमचा तिन्ही कायद्यांना पाठिंबा आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस, डावे पक्ष आणि हिंसक लोक करत आहेत. या आंदोलनाने राजकीय स्वरूप घेतले आहे. या तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल, असे प्रकाश म्हणालेत. दरम्यान, दिल्लीत सुरू असलेले नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन करण्यात आले. सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. “आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल.” असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला