आक्रमक पटोले काँग्रेसला नवसंजीवनी देतील का?

काँग्रेस पक्षातील आक्रमक नेते नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांची परिस्थिती पिंजºयात अडकवून ठेवलेल्या वाघासारखी होती. वर्गात गडबड करणारा मुलगा कॅप्टन झाल्यासारखे वाटत होते. पटोले हे रांगडे नेते आहेत. कुणालाही अंगावर घेण्याची तयारी असलेले. विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीत ते आॅडमॅन वाटायचे. त्यांची आजवरची एकूण राजकीय कारकिर्द बघितली तर ते अशा संवैधानिक पदावर बसतील आणि तिथेच टिकून राहतील असे कोणी म्हणू शकत नाही आणि झालेही तसेच केवळ बारा-तेरा महिन्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमले आहे. काँग्रेस आज राज्यातील चवथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम पटोले कितपत करू शकतील? पटोले बंडखोर स्वभावाचे आहेत. एखाद्या मुद्यावर पटले नाही तर ते बंडाचा झेंडा फडकवतात हे एकदा नाही दोनवेळ सिद्ध झाले आहे. ते काँग्रेसमधून तसेच बाहेर पडले आणि भाजपमध्ये गेले होते. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांवर टीका करून ते काँग्रेसमध्ये परतले. नेतृत्वाशी झगडा करणारा हा नेता आहे. स्वत:च्या मतांवर ते तडजोड स्वीकारत नाहीत.

काँग्रेसला अशा नेतृत्वाची सवय नाही. त्यामुळे राज्यातील इतर नेत्यांना ते कितपत रुचतील हा प्रश्न आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुकल वासनिक, नितीन राऊत यांच्यापासून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांशी ते कितपत जुळवून घेतील हा प्रश्नच आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या बड्या नेत्यांचे प्रदेश काँग्रेसमध्ये प्रभावी गट आहेत. तिकडे राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले खा. राजीव सातव आहेत. एआयसीसीमध्ये प्रभावी असलेले मुकुल वासनिक आहेत.

पटोले यांनी इतरांना सांभाळून घेणे आणि पटोले यांना इतर नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मनापासून स्वीकारून मदत करणे असे दोन्ही मुद्दे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी हे एकचालकानुवर्ती पक्ष आहेत. अनुक्रमे उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा शब्द त्या पक्षांमध्ये अंतिम आहे. काँग्रेसमध्ये तसे नाही, अतिलोकशाही आहे. अतिलोकशाही सहन करतील असा पटोले यांचा स्वभाव नाही. त्यामुळे इतर नेत्यांशी त्यांचे सूर जुळतील का यावर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची आणि पक्षाची वाटचाल अवलंबून असेल.

पटोले हे कुणबी समाजाचे म्हणजे बहुजन समाजाचे आहेत. जातीचा फॅक्टर समोर ठेवून पटोले यांना संधी दिली गेली असे दिसते. बहुजन समाज आजही मोठ्या प्रमाणात भाजपकडे आहे. पूर्वी हा समाज काँग्रेससोबत होता. त्याला पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याचे आव्हान पटोले यांच्यासमोर असेल. पक्षातील मराठा नेत्यांची मर्जी सांभाळत हे आव्हान त्यांना पेलावी लागेल. ते प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी एक नाही दोन तगड्या लॉबी सक्रिय होत्या. कुणाच्या मनात थोरात हेच अध्यक्षपदी कायम राहावेत असे होते. कुणी सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासाठी लॉबिंग करीत होते. पटोले अध्यक्ष झाल्याने या लॉबींमध्ये निश्चितच अस्वस्थता असणार. काँग्रेस अंतर्गत राजकारण अनादीकालापासूनचे आहे. पटोेले यांच्या नशिबीही ते येणारच हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातून वाट काढत पटोले यशस्वी झाले तर ते नक्कीच मोठे होतील पण त्यांचे असे मोठे होणे सहन होऊच शकत नाही असे काही नेते पक्षात आहेत. ते पटोलेंना किती मदत करतात ते बघायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER