प्रियकरासोबत राहणार्‍या  पत्नीचा हक्क राहिला अबाधित विचित्र तथ्यांच्या प्रकरणात हायकोर्टाचा निकाल

Nagpur HC

मुंबई : एखाद्या पतीची पत्नी प्रियकरासोबत पळून जाऊन २४ वर्षे  त्याच्याकडेच राहत असली तरी जोपर्यंत तिचे त्या पतीशी असलेले वैवाहिक संबंध कायद्यानुसार भंंग केले जात नाहीत तोपर्यंत ती त्या पतीची लग्नाची बायकोच राहते, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, अशा प्रकारे घर सोडून  निघून गेलेली पत्नी आता कीही परत येणार नाही असे गृहित धरून त्या पतीने दुसरा विवाह केला तर तो विवाह कायद्याने अवैध ठरतो. त्यामुळे या पतीच्या नोकरीच्या ठिकाणी ‘सर्व्हिस रेकॉर्ड’मध्ये या दुसºया पत्नीचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून नोंदले जाऊ शकत नाही. अशा ‘सर्व्हिस रेकॉर्ड’मध्ये पत्नी म्हणून जर कोणाचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून लावायचे असेल तर ते फक्त त्या पळून गेलेल्या पत्नीचेच लावले जाऊ शकते.

सुरेंद्रगढ, सेमिनरी हिल, नागपूर येथे राहणारे दुर्गय्या पोच्चम सुल्लेवार व त्यांची दुसरी पत्नी बायका लक्ष्मीबाई यांनी केलेले अपील फेटाळताना न्या. ए, एस. चांदूरकर व न्या. एन. बी. सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. दुर्गय्या नागपूर येथील हवाईदल केंद्रात पहारेकरी म्हणून नोकरीला होते. त्यांचा सन १९७९ मध्ये अरुणा हिच्याशी विवाह झाला. सुमारे १० वर्षांचा संसार व तीन मुले झाल्यानंतर अरुणा दुर्गच्या व मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली.

काही वर्षांनी दुर्गय्या यांनी पतीपासून वेगळ््या राहणाºया परंतु रीतसर घटस्फोेट न झालेल्या बाय.का लक्ष्मीबाई हिच्याशी दुसरे लग्न केले. आधी दुर्गय्या यांनी नोकरीच्या ठिकाणी ‘नॉमिनी’ म्हणून अरुणा व मुलांची नावे दिली होती. लक्ष्मीबाईशी लग्न केल्यावर त्यांनी अरुणाच्या ऐवजी लक्ष्मीबाईचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून दिले. हवाईदलाच्या कार्यालयाने दुर्गय्याच्या विनंतीनुसार त्याच्या ‘सर्व्हिस रेकॉर्ड’मध्ये तसे बदल केले.

अरुणाला हे समजल्यावर तिने कुटुंब न्यायालयात याचिका केली. कुटुंब न्यायालयाने दुर्गय्या यांच्या ‘सर्व्हिस रेकॉर्ड’मध्ये पत्नी म्हणून लक्ष्मीबाईचे नाव ‘नॉमिनी’साठी लावणे बेकायदा असल्याचे जाहीर करून तिच्याऐवजी अरुणा हिचे नाव लावण्याचा आदेश दिला. याविरुद्ध दुर्गय्या व लक्ष्मीबाई यांनी अपील केले होते.

कुटुंब न्यायालयाचा निकाल योग्य ठरविताना उच्च न्यायालयाने खालील मुद्दे विचारात घेतले:

  • पत्नी व आईची जबाबदारी जबाबदारी पार न पाडता अरुणा पती व मुलांना वाºयावर सोडून गेली २४ वर्षे प्रियकरासोबत राहते आहे हे दुर्गय्याचे म्हणणे खरे मानले तरी अजूनही अरुणा हिच त्याची लग्न्गाची बायको आहे. कारण तिला त्याने रीतसर घटस्फोट दिलेला नाही किंवा कोणत्याही सक्षम न्यायालयाने त्यांचे विवाहसंबंध संपुष्टात आणलेले नाहीत.
  • दुर्गय्याने लक्ष्मीबाईशी केलेले लग्न अवैध आहे. कारण पहिली पत्नी हयात असताना व तिला रीतसर घटस्फोट न देता केलेले दुसरे लग्न कायदेशीर नाही. त्यामुळे लक्ष्मीबाई ही दुर्गय्याची लग्नाची बायको नाही.
  • केंद्र सरकारच्या नियमांनुसार त्यांच्या कर्मचाºयांच्या ‘सर्व्हिस रेकॉर्ड’मध्ये फक्त लग्नाच्या बायकोचेच नाव ‘नॉमिनी’ म्हणून लावता येते. त्यामुळे लक्ष्मीबाईचे नाव लावणे चुकीचे आाहे. पत्नी या नात्याने ‘नॉमिनी’ म्हणून नाव लावून घेण्याचा फक्त अरुणाचाच अधिकार आहे.
  • दुर्गय्याच्या म्हणण्यानुसार अरुणाने व्यभिचार केला असला तरी त्यने तिला रीतसर घटस्फोट दिलेला नसल्याने पत्नी म्हणून तिच्या हक्काला त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER