‘खेलरत्न’ मिळूनही राणी रामपालचे आईवडील चिंतित का होते?

Rani Rampal

महिला हॉकीपटूलाही (Women hockey players) कधी राजीव गांधी खेलरत्न (Khel Ratna) सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचा सन्मान मिळेल असे तिला वाटलेही नव्हते. म्हणून शनिवारी बेंगळुरू येथे हा पुरस्कार स्वीकारताना नकळत तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या सन्मानाने उत्साह दुणावलेल्या आणि जबाबदारी वाढल्याची जाण असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल (Rani Rampal) हिचे पुढचे लक्ष्य आता ऑलिम्पिक पदक (Olympic medal) आहे.

यंदा या पुरस्काराच्या पाच मानकऱ्यांपैकी एक ती असल्याची घोषणा झाली. त्यावेळीसुद्धा तिची अवस्था अशीच झाली होती. राणी अचानक एवढी भावुक का झाली हा तिच्या आईवडिलांना प्रश्न पडला होता; कारण हा केवढा मोठा पुरस्कार आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. बेंगळुरू येथून फोनवर आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी देतानासुद्धा ती रडत होती आणि ती रडत असल्याने तिकडे तिचे वडील आनंदापेक्षा चिंतित जास्त झाले होते. त्यांना जेव्हा हा पुरस्कार किती महत्त्वाचा आहे हे तिने समजावून सांगितले तेव्हा साहजिकच त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आणि राणीप्रमाणेच तेसुद्धा भावुक झाले.

भारतीय खेळाडूंमध्ये राणीचा प्रवास हा जमीन ते आसमान असा विलक्षण राहिला आहे. हरियाणातील शाहाबादच्या गाडीवानाची ही मुलगी. वयाच्या १५ व्या वर्षीच ती भारतीय संघात पोहचली तेव्हा ती संघातील सर्वांत कमी वयाची खेळाडू होती.

‘खेलरत्न’ पुरस्कार हा आपली मेहनत, समर्पण व खेळासाठी त्यागाचे फळ आहे; मात्र ऑलिम्पिक पदक हे कोणत्याही खेळाडूसाठी यशाचे शिखर आहे. पुढील वर्षी टोकियोत हे लक्ष्य गाठण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, असे तिने म्हटले आहे. कोविड-१९ च्या महामारीत लोकांचे प्राण वाचविण्यासाठी व आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर्स व इतर कार्यकर्त्यांना तिने आपला हा पुरस्कार समर्पित केला आहे. त्यासोबत आपल्या संघालासुद्धा तिने हा पुरस्कार समर्पित केला आहे. या पुरस्काराने आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांना अधिक चांगली कामगिरी करण्यास उत्तेजन मिळेल असा तिला विश्वास आहे. गेल्या काही वर्षांत महिला हॉकी संघाची दखल घेतली जात आहे ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ती म्हणते. कोरोनानंतर केवळ भारतच नाही तर जगातील इतर सर्व संघांनाही पूर्वीची लय मिळण्यास वेळच लागेल, किमान तीन-चार महिने तरी लागतील; पण या विश्रांतीने संघांना आपली ध्येये व आपल्या लक्ष्यांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळाली आहे असे तिला वाटते. या काळात आम्ही कोणत्या क्षेत्रात सुधारणा करता येतील याचा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाचाही सखोल अभ्यास केला आहे असे ती सांगते.

राणी सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या बेंगळुरू केंद्रात आहे; पण याच ठिकाणी भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. महिला संघाच्या सर्व खेळाडूंचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले. या काळात योग्य काळजी घेतल्याबद्दल राणीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER