वीणा का नव्हती ?

Vina

मनोरंजन इंडस्ट्री मध्ये जोड्या जुळायला अनेकदा वेळ लागतो पण या जोड्या तुटायला एक कारणही पुरेसं होतं. गेल्या काही दिवसात मराठी मनोरंजन सृष्टीत एकमेकांसोबत नेहमी दिसणाऱ्या जोड्यांची चांगलीच चर्चा रंगली होती आणि यामध्ये अभिनेता कोरिओग्राफर शिव ठाकरे आणि अभिनेत्री विणा जगताप यांची जोडी वरच्या क्रमांकावर होती. बिग बॉस या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आले आणि हा शो संपला तेव्हा ते आयुष्यभराचे जोडीदार बनून या घरातून बाहेर पडले होते. कधी कधी एखाद्या रियालिटी शोच्या प्रमोशनसाठी अशा जोड्या मुद्दाम जुळवल्या जातात हे देखील पडद्यामागचे सत्य आहे. पण विणा आणि शिव यांच्या बाबतीत मात्र हे आयुष्याचं सत्य होतं हे बिग बॉस नंतर या दोघांनी नेहमी एकत्र राहत दाखवून दिलं. सोशल मीडिया पेजवर त्यानंतर शिव कधी एकटा दिसला नाही आणि विणा कधी एकटी दिसली नाही. ही जोडी नेहमीच एकत्र दिसत होती. पण नुकताच शिवने बी रिअल हा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आणि या लॉन्चिंग पार्टीमध्ये मात्र त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आणि लवकरच त्याच्या आयुष्याची साथीदार होणारी विणा मात्र कुठेच दिसली नाही. या सोहळ्याला विणाचं नसणं हे चर्चेला निमित्त ठरलं.

विणा आणि शिव चे भांडण झालं का या चर्चेपासून सुरुवात झालेला हा मुद्दा थेट आता शिव आणि वीणाच ब्रेकप झालं इथपर्यंत पोहोचला आहे. शिव आणि वीणा यांच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियामध्ये चांगलीच रंगली आहे.

वीणा आणि शिव ही जोडी बिग बॉस पुरती दिसेल आणि त्यानंतर या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या होतील असे अनेक अंदाज वीणा आणि शिव एकत्र आले तेव्हापासूनच व्यक्त केले जात होते. पण या सगळ्या अंदाजांना फोल ठरवत विणा आणि शिवने त्यांचे नातं टिकवून ठेवलं होतं. त्यानंतर बिग बॉस हा शो संपल्यानंतरही अनेक वाहिन्यांनी तसेच मनोरंजन विषयक कार्यक्रम करणाऱ्या निवेदकांनी ही जोडी कॅच करण्याचा प्रयत्न केला. आता फक्त विणा आणि शिव लग्न कधी करणार आहेत एवढेच काय ते त्यांच्याकडून ऐकणं बाकी होतं इतके ते दोघं एकमेकांसोबत असायचे. अमरावतीच्या शिवच्या घरी गेलेले विणाचे फोटो आणि व्हिडिओ त्या दोघांनी शेअर केले. त्यानंतरही शिव आणि वीणा यांची भटकंती मनमुराद सुरू असल्याचे त्यांच्या दोघांच्याही सोशल मीडिया पेजवर फोटो आणि व्हिडिओच्या रूपाने चाहते पाहत होते. आता विणाने तिच्या सोशल मीडिया पेजवरून शिवला अनफॉलो केले असल्याचं दिसल्यामुळे पुन्हा एकदा त्या दोघांच्याही चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. वीणाने शिवला अनफॉलो करणं आणि त्याच्या परफ्युम ब्रँड लॉन्चिंग पार्टीमध्ये वीणाचं अनुपस्थित असणं हे सगळच विणा आणि शिव यांच्या नात्यात दुरावा आल्याची चिन्ह असल्याचं दाखवत आहेत. त्याची चर्चा सोशल मीडिया मध्ये रंगली आहे.

विणा सध्या आई माझी काळुबाई या मालिकेत आर्याची भूमिका करत आहे. दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून विणा या मालिकेचा भाग बनली. मालिकेच्या निमित्ताने ती सध्या साताऱ्यात मुक्काम ठोकून आहे. बिग बॉस संपून बरेच दिवस झाले तरी अद्याप शिवला अभिनय किंवा त्याच्या नृत्य कलेला वाव मिळेल अशी संधी अजून तरी मिळालेली नाही यावरून वीणा आणि शिव यांच्यामध्ये काही खटका उडालाय का अशी शक्यता या दोघांच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आजपर्यंतच्या शिवच्या प्रत्येक गोष्टीचा विणा अविभाज्य भाग होती तर विणाच्या प्रत्येक टप्प्यावर तिला शिवची सोबत होत होती. आयुष्यातील त्याच्या स्वतःच्या परफ्यूम लॉन्चिंग सोहळ्यासाठी साताऱ्याहून मुंबईत पोहोचणे विणासाठी फार अवघड नव्हतं तरीही विणा या कार्यक्रमात कुठेच दिसली नाही. इतकेच नव्हे तर वीणाने तिच्या सोशल मीडिया पेजवर कुठेच शिवच्या परफ्यूमचं प्रमोशनही केलेलं नाही, ना या कार्यक्रमाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. शिवसाठी काहीही करेन असं म्हणणाऱ्या वीणाने त्याच्या कार्यक्रमाची काहीच दखल घेतली नसल्याने या दोघांमध्ये ब्रेकअप झाले असावे अशी जोरात चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER