पोलिसांनी डोकानियांना ताब्यात घेताच भाजप का घाबरला? नवाब मलिकांचा सवाल

Pravin Darekar - Devendra Fadnavis - Nawab Malik

मुंबई : ‘एका साठेबाजाला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार स्वत: पोलीस ठाण्यात जातात, याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी भाजपचा (BJP) प्रयत्न आहे.’ असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीकेसी पोलिसांनी काल ब्रुक फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी अटक केली.

हे समजताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे रात्रीच्या वेळी थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावरून महाविकास आघाडीने भाजपला घेरले. ‘राज्यातील भाजप का घाबरलाय? भाजप साठेबाजाची वकिली का करतोय याचे उत्तर जनतेला द्यायला हवे.’ अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया (Rajesh Dokania) यांनी राज्य सरकारशी संपर्क साधला. आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, तो विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. डोकानिया यांनी प्रवीण दरेकर यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांची भेट घेतली, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

‘ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर त्या आधारावर पोलिसांनी डोकानिया यांना ताब्यात घेतले. मात्र, एफडीएने रात्री १० वाजता दिलेल्या परवानगीची कॉपी दाखवल्यावर त्यांना सोडण्यात आले. पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करते. काळाबाजार रोखण्यासाठी काम करते. साठा असेल तो जप्त करून लोकांना दिला पाहिजे, या भूमिकेतून काम करते. पण डोकानियांना ताब्यात घेतल्यानंतर भाजप का घाबरलाय? देवेंद्र फडणवीस डोकानियांचे वकीलपत्र घेऊन त्यांची बाजू का मांडत होते? डोकानियांबरोबर भाजपचे काय संबंध आहेत, याचा खुलासा भाजपनेच करावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

‘नवाब मलिक काहीही बोलत राहतात.’ असे भाजपचे नेते म्हणतात. पण मी काहीही बोलत नाही. आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, असे तुम्हीच ट्विट करता. ५० हजारांचा साठा आम्ही वाटणार आहे, असेही सांगता. मग राज्य सरकार रेमडेसिवीर मागत असेल तर केंद्रातील सरकार का देत नाही? राज्याचा विरोधी पक्षनेता फोनवर माहिती घेऊ शकतो किंवा चौकशी करणार्‍या पोलीस अधिकाऱ्याच्या वरिष्ठांसोबत चर्चा करू शकतो. मात्र, प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकारे वकिली करण्यामागे नेमके राजकारण काय? असा सवाल मलिक यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button