टाळेबंदीचा बागुलवबुवा कशासाठी ?

Shailendra Paranjapeकरोनाचे (Corona) रुग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू होत आहे. करोनावर अद्याप लस आलेली नसल्याने काळजी घ्यायलाच हवी, असे सांगतानाच यानंतर करोनाची सुनामी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसंच राज्यात तूर्तास टाळेबंदी किंवा संचारबंदीचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही आठ ते दहा दिवसांनंतर करोना रुग्णसंख्येबाबतची स्थिती बघून टाळेबंदीसंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं पुण्यात सांगितलंय. अनेक तज्ज्ञांनी करोनाची दुसरी लाट येण्याबद्दलचे अंदाज वर्तवले आहेत, असंही पवार यांनी सांगितलंय. पुण्यामधे दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत उसळलेल्या गर्दीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की पुण्यातली गर्दी बघून असं वाटलं की पुण्यातला करोना गर्दीत चेंगरून मेला की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना हेही स्पष्ट केलंय की अहमदाबादसारख्या शहरात वाढत्या करोना फैलावामुळं रात्रीची संचारबंदी लागू केली गेलीय पण राज्यात तसं काही करण्याचा विचार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलेला उपाय महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलंय की केवळ नियम करून सगळ्या गोष्टी होत नाहीत त्यामुळे नागरिकांनी नियम पाळले तर निर्बंध आणावे लागत नाहीत. ही गोष्ट खरी आहे आणि सर्वच नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळायला हवी. करोनाचे सारे निर्बंध पाळायला हवेत.

दिवाळीला सर्वच पर्यटनस्थळांना नागरिकांनी गर्दी केली होती. त्याशिवाय घरगुती स्वरूपाचे अनेक लोकांना एकत्र आणणारे कार्यक्रमही आयोजित केले गेले. त्यातून करोना पसरण्याची भीती असते. कोणत्याही छोटेखानी कार्यक्रमाला जाताना सुरक्षित अंतर पाळणे, सँनेटायझरचा वापर आणि मास्क परिधान करणे अत्यावश्यक आहे, हे विसरता कामा नये. अनेक जण घरगुती कार्यक्रमात किंवा बंदिस्त ठिकाणी मास्क काढून ठेवतात पण कार्यक्रमाला जमलेल्यांपैकी एखादी व्यक्ती जरी कँरियर असेल तर करोना पसरण्याचा धोका कायम राहतो, याची खूणगाठ बांधायला हवी.

पुण्यामधे वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः करोना रुग्णांवर उपचार करण्यामधे आघाडीवर असलेल्या काही डॉक्टर मित्रांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलीय. त्यांच्या मते पुण्यात लॉकडाऊनच्या काळामधे करोनाच्या अतिसंसर्गाच्या काळात दिवसाला अडिच हजार रुग्ण दाखल होत होते. गेल्या सात आठ महिन्यांच्या अनुभवानंतर पुण्यामधे आता रोज तितकेच रुग्ण आले तरी त्यांची यशस्वीपणे वैद्यकीय काळजी घेण्याइतकी क्षमता आरोग्य व्यवस्थेमधे निर्माण झालेली आहे. पुण्यात रोज अडीच हजार रुग्ण करोनाबाधित व्हावेत, असं कोणीच म्हणणार नाही पण आज दिवसाला केवळ सातशे रुग्ण बाधित होत असताना टाळेबंदीची चर्चा किंवा भीती का घातली जात आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

लोकांना करोनाचे गांभीर्य नाही, हे वाक्य कुणालाही सहज पटते. कारण त्यात स्पेसिफिक काहीही नमूद केलेल नसते. आपण स्वतः सोडून बाकीचे बेजबाबदारच असतात, असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे अशा विधानांमधून टाळेबंदीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यातून पालकमंत्री अजित पवार आढ-दहा दिवसांनंतर परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असं म्हणाले असले तरी टीव्ही वाहिन्यावाले प्रश्नचिन्ह टाकून पुण्यात टाळेबंदी, अजित पवारांचे सूतोवाच, अशा बातम्या देऊन घबराट पसरवतात. जणू टाळेबंदी दारावर येऊनच ठेपलीय.

माध्यमे, पेपरात येणारे गर्दीचे फोटो यापेक्षाही करोनाला तोंड देण्याची आरोग्यव्यवस्थेची क्षमता आणि सिद्धता, लोकांमधे एप्रिल मे महिन्यांच्या तुलनेत आज निर्माण झालेली करोनाविषयक जाणीव, मुंबई दिल्लीपेक्षाही मास्क वापरण्याबद्दलची जागरूकता, हे सारं लक्षात घेऊन निर्णय घेतले जायला हवेत. अन्यथा, पुणेकर असे एकतर्फी निर्णय घेणाऱ्यांच्या अव्यापारेषु व्यापाराला टाळे लावायला मागेपुढे बघणार नाहीत.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :– ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER