राज्यपालांच्या स्वेच्छानिधीवरून एवढे राजकारण का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

पाच कोटी स्वेच्छा निधी दिला तर एवढं राजकारण येथे केलं जातं

Devendra Fadnavis - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : काही दिवसांपासून फडणवीस आणि राज्यपालांच्या स्वेच्छानिधीसंदर्भात टीकात्मक बोलले जात आहे. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरुद्ध गटाकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या स्वेच्छानिधीच्या रकमेवरून काही माध्यमांमध्ये बातम्या झळकत आहेत. याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सपशेल उत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यपालांचा स्वेच्छानिधी १५ लाखांवरून पाच कोटी केला. याच मुद्द्याचे आता कोरोनाच्या काळात राजकारण होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
राज्यपालांचा स्वेच्छानिधी गेल्या ३० वर्षांत वाढला नव्हता. राज्यपालांचा स्वेच्छानिधी म्हणजे कोणाला चहापानाला देण्याचा पैसा नाही. त्याचे नियम आहेत. राज्यपाल आदिवासी विभागात जातात. तेथे गेल्यानंतर आदिवासी शाळेची दुर्दशा त्यांना दिसली तर त्या स्वेच्छानिधीतून ते त्या शाळेकरिता पैसा देऊ शकतात. राज्यपाल एखाद्या ठिकाणी गेले. तेथे दवाखान्याची परिस्थिती ठीक नसेल तर आपल्या स्वेच्छानिधीतून ते त्यांना पैसे देऊ शकतात. हा स्वेच्छानिधी म्हणजे राज्यपालांच्या खिशात टाकायचा निधी नाही, असे फडणवीस म्हणाले.

तसेच, त्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत आमदारांना स्वेच्छानिधी, खासदारांना स्वेच्छानिधी, मुख्यमंत्र्यांना स्वेच्छानिधी; पण, राज्यपालांना मात्र, एखाद्या ठिकाणी तातडीची मदत करायची असेल तर राज्याच्या पालकानेच राज्य सरकारचं तोंड पाहात राहायचं आणि त्यासाठी सहा महिने लागायचे हे योग्य नाही. राज्यपालांचा सन्मान राहिला पाहिजे, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी आघाडी सरकारला सुनावले आहे.

तसेच, मागील काळात आम्ही १५ लाखांचे पाच कोटी केलेत. राज्यपालांनी ते खर्चदेखील केले नाहीत. राज्यपालांना ज्या वेळेस योग्य वाटेल आणि जी बाब योग्य वाटेल त्याच्यावर ते खर्च करतील; पण राज्यपालांना पाच कोटी स्वेच्छानिधी दिला तर एवढं राजकारण येथे केलं जातं. आणि तुम्ही कोरोना सुरू असताना एककीकडे पगार कपात करता आणि १२०० कोटी रुपये स्वेच्छानिधी आमदारांना देता. म्हणजे पगार देणे महत्त्वाचे नाही. हेल्थ वर्करचे पगार थकवता आणि कोटींच्या रकमेत आमदारांना स्वेच्छानिधी देऊन कोणती आवश्यक कामं राज्य सरकार करत आहे? तर कोणतीही आवश्यक कामं झाली नाही. उलट कोरोनाच्या काळात कोरोना योद्धे हेल्थ वर्करना अधिकचा पगार देणे आवश्यक आहे. हे केवळ राजकारण आहे, असेही फडणवीस म्हणाले. तसेच, राज्यपालांनी काय मागणी केली आहे? हे राज्यपाल निवासस्थानी आहे. मी काही राज्यपालांचा प्रवक्ता नाही.

मात्र राज्याच्या पालकांनाच असे प्रश्न, टीका केली तर खरं समोर आणणे कर्तव्य बनते. कारण अलीकडच्या काळामध्ये राज्यपालांनी त्यांच्या मनासारखे केले तर राज्यपाल चांगले, नाही तर शिव्या घालण्यास तयार. कधी कमरेपासून वाकून नमस्कार करायचा तर कधी काही लिहून त्यांच्यावर टीका करायची. राज्याच्या पालकाचा अपमान करायचा. कधी चांगलं लिहायचं, कधी वाईट लिहायचं- अशा शब्दांत नाव न घेता फडणवीस यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER