नींद ना मुझ को आये…

Sleep deprivation

हे गाणं आपण नक्की ऐकलं  असेल. झोपेवर किती गाणी आहेत, नाही का ? म्हणजे झोप ही किती आवश्यक आहे हे सांगण्याची तशी गरज नाही. अति किंवा न झोपण्याने (स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या) माणसाला किती त्रास होतो हे प्रत्येकाने नक्कीच अनुभवले असेल.

योग्य प्रमाणात झोप येणे ही स्वास्थ्यकर आहे. अकाळी (दिवसा / संध्यासमयी/ सूर्योदय), आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मुळीच न झोपणे आयुष्याला हानीकर आहे.

आयुर्वेदात निद्रा तीन उपस्तंभापैकी एक सांगितली आहे. उपस्तंभ म्हणजे piller. शरीराची स्थूलता आणि कृशता ही निद्रा व आहारजन्यच असते. ज्या प्रकारे योग्य आहार मनुष्य व प्राण्याच्या जीवनरक्षणाकरिता, स्वास्थ्यासाठी अनिवार्य आहे, तेवढीच गरजेची आहे योग्य प्रमाणात झोप !

ही बातमी पण वाचा : डॉक्टर मला बारीक व्हायचयं !!

आयुर्वेद संहितात माणसाला झोप का येते, योग्य प्रमाणात घेतलेल्या झोपेचे लाभ, निद्रानाश वा अतिनिद्रा, रात्री जागरणाने होणारे व दिवसा झोपल्याने होणारे आजार, झोप येत असूनही न झोपण्याने कोणते आजार होऊ शकतात व या सर्व तक्रारींवर उपाय योजना इतके विस्तृत वर्णन केले आहे. आयुर्वेदशास्त्रात किती सखोल विचार केलाय पाहा निद्रा या उपस्तंभाचा ! मुख्य म्हणजे झोपेचे सहा  प्रकार वा भेद आयुर्वेदात सांगितले आहेत.  उदा. रात्री स्वाभाविक येणारी, काही आजारामुळे , कफ वाढल्याने येणारी, शरीर व मन थकल्यामुळे येणारी निद्रा इत्यादी.

रात्री येणारी स्वाभाविक झोप ही आयुष्य, बल, पुष्ट करणारी आहे, सुख देणारी आहे. कुणाची चिडचिड होत असेल वा डोकं वा अंग दुखत असेल, कुणी दुःख करत असेल तर आपण लगेच सल्ला देतो- जरा वेळ झोप किंवा रात्री झोप झाली नाही का, असे विचारतो, हो ना ? म्हणूनच झोप घेणे हे सुखकारक व स्वास्थ्यकारक आहे.

आपण या स्वाभाविक शरीर वेगाला ग्राह्य धरतो आणि नाहक आजारांना आमंत्रण देतो. कधी कधी नोकरी, रात्रपाळी, अभ्यास किंवा काहीच कारण नसताना जागण्याने झोप होत नाही. मग डोके दुखणे, अंग दुखणे, जडपणा, उत्साहहानी, चक्कर येणे, अपचन, तंद्री अशी लक्षणे दिसतात. बरेच दिवस असेच सुरू राहिले तर मोठ्या आजारात परिवर्तन होते. मग झोपेची औषधे, बीपीची औषधे घ्यावी लागतात. मग याला कसे थांबविता येईल ? महत्त्वाचे म्हणजे वेळवर झोप घेणे. नोकरी, रात्रपाळी, अभ्यास अशा अपरिहार्य कारणांमुळे रात्री झोप झाली नसेल तर दिवसा झोपावे.

दिवसा झोपण्यास मनाई आहे; पण याला काही अपवाद आहेत. उदा. उन्हाळा ऋतू, कृश व्यक्ती, अति पायी फिरणारे, लहान मुले, वृद्ध, आजारी, दुःखी इत्यादी व्यक्ती. यांना दिवसा झोपण्याने त्रास होत नाही. इतर ऋतूत, स्वस्थ – स्थूल व्यक्ती दुपारी झोपल्याशिवाय होतच नाही.  असे असेल तर खुर्चीत बसून झोप काढावी; त्याने त्रास होत नाही व वजनही वाढत नाही.

झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. जसे काही आजारामुळे, वात वाढल्यामुळे, एखाद्या कामात व्यग्र झाल्याने, वात व पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असणे.

निद्रानाशावर काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत :

 1. अभ्यंग – मालीश करणे, उटणे लावणे, स्नान करणे या गोष्टींनी शरीर, मन शांत होऊन झोप येते.
 2. दूध-भात, तूप खाणे.
 3. म्हशीचे दूध निद्राजनक आहे.
 4. मनाला सुख देणारे गंध, संगीत किंवा संवाद यांचे अवलंबन.
 5. आपण झोपतो ती रूम, बिछाना स्वच्छ, नीटनेटका आल्हाददायक असणे.
 6. रात्री वेळेवर झोपण्यास जाणे. नेत्रतर्पण, शिरोधारा, शिरोलेप इ.आयुर्वेद चिकित्सा घेणे.

जसे निद्रानाशावर उपाय आहेत तसेच अतिनिद्रेवर पण ! कारण अतिनिद्रा हीदेखील व्याधीच आहे.  त्यामुळे वेळीच त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी –

 1. विरेचन पंचकर्म, नस्य ( नाकात तेल / चूर्ण यांचा वापर) खूप उपयोगी आहे.
 2. व्यायाम करणे.
 3. उपवास वा लंघन ( हलका सुपाच्य आहार)
 4. कष्टकर बिछाना म्हणजे आरामदायक बेडवर न झोपणे.
 5. योगाभ्यास
 6. अति झोप येणाऱ्या व्यक्तीला चिंता, शोक, भय, क्रोध आणावा हीसुद्धा एक चिकित्सा सांगितली आहे; ज्यामुळे अशा अति झोपाळू व्यक्तीची शब्दशः झोप उडते.

अशा प्रकारे योग्य प्रमाणात झोप सौख्यकारक आहे. इंग्रजीत म्हणतात ना – A good laugh and a long sleep are two best cures for anything!

Why sleep is important and what happens when you don’t get

वै. शर्वरी संदिप मिशाळ
MD (Ayu)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER