शारजातच धावांची बरसात का होतेय?

Rajasthan Royals

आयपीएल 2020 (IPL) मध्ये आतापर्यंत जेवढे सामने झाले आहेत त्यात धावांची अक्षरशः बरसात शारजातच (Sharjah) झालीय. शारजातल्या दोन सामन्यात मिळून 79.3 षटकातच 865 धावा निघाल्या आहेत म्हणजे षटकामागे 10.88 धावा.

22 तारखेच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajstan Royals) 7 बाद 216 आणि चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 6 बाद 200 धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी किंग्ज इलेव्हनने (Kings Xi Punjab) 2 बाद, 223 आणि राजस्थान रॉयल्सने 6 बाद 226 धावा केल्या.याप्रकारे शारजातील चारही डावात 200पेक्षा अधिकच धावा निघाल्या आहेत.

याच्या तुलनेत आयपीएलचे इतर सामने होत असलेल्या अबुधाबी व दुबईत एवढ्या धावा होत नाहीत.याचे कारण काय?

पहिले कारण म्हणजे शारजाची खेळपट्टी ही दुबई व अबुधाबीप्रमाणे जलद गोलंदाजांना सहायक नाही आणि दुसरे म्हणजे शारजाच्या मैदानाचा आकार…

शारजात सरळ सीमारेषा आहे 73 मीटरवर आणि अबुधाबीत आहे 77 मीटरवर. म्हणजे शारजातील सीमारेषा चार मीटरने (13 फूट) जवळ आहे. याचप्रमाणे लाँग ऑफ व लाँग ऑनच्या सीमारेषा अबुधाबीत 74 व 77 मीटरवर आहेत तर शारजात त्या 71 व 65 मीटरवर आहेत. खेळपट्टीच्या काटकोनातील सीमारेषासुध्दा (स्क्वेअर) शारजात अबुधाबीपेक्षा पाच आणि 12 मीटर जवळ आहेत.थर्ड मॕन आणि फाईन लेगच्या सीमांचे अंतरसुध्दा अबुधाबीच्या मैदानापेक्षा शारजात एक व नऊ मीटरने जवळ आहे.

याचा परिणाम हा की शारजात जो षटकार ठरतो तो अबुधाबीत चौकार असतो. किंवा कदाचित अबूधाबीत फलंदाज झेलबाद होण्याचीसुध्दा शक्यता जास्त असते. शारजातील सीमा जवळ असल्याचा उघड परिणाम म्हणजे येथे दोन सामन्यांतच 62 षटकार लागले आहे. याच्या तुलनेत सात सामन्यांतील षटकारांची संख्या 55 आहे. शारजातील पहिल्या सामन्यात रॉयल्स व सुपर किंग दरम्यान 33 षटकार लागले तर काल रॉयल्स व पंजाबदरम्यान 29 षटकार लागले.

शारजात पहिल्या सामन्यात धोनीने मारलेल्या षटकारावेळीही चेंडू मैदानाबाहेर रस्त्यावर आला होता आणि काल राहुल तेवटीया मारलेल्या एका षटकारावेळीही तसेच घडले. हे बघून प्रसिध्द समालोचक हर्ष भोगले यांना प्रश्न पडलाय की, नव्वदीच्या दशकात आम्ही येथे सामने कव्हर करायचो तैंव्हा तर हे मैदान एवढे छोटे भासत नव्हते? खरोखरच मैदान छोटे झालेय की खेळाडूंच्या मनगटातील ताकद वाढली आहे?

ही बातमी पण वाचा : IPL 2020 KXIP vs RR: राजस्थान रॉयल्सने विजयासह मोडले हे ३ विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER