रोहित शर्माने सात वर्षांनंतर गोलंदाजी का केली?

आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तब्बल सात वर्षांनंतर गोलंदाजी (Bowling) केली. कोलकाता नाईट रायडर्साविरुद्ध (KKR) त्याने एकच षटक टाकले. त्यात नऊ धावा निघाल्या. पण त्यानिमित्ताने कधीकाळी रोहित गोलंदाजीसुद्धा करायचा याची आठवण झाली.

आयपीएलमध्ये हॅट्ट्रिकसुद्धा त्याच्या नावावर आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी खेळताना मुंबईविरुद्धच त्याने ही हॅट्ट्रिक नोंदवताना पाच चेंडूंत चार बळी मिळवले होते; पण २०१४ च्या आयपीएलपासून त्याने चेंडू हाती घेतलेला नव्हता. दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी करायचे टाळलेच होते. मग मंगळवारी केकेआरविरुद्धच त्याला का गोलंदाजी करावीशी वाटली? चेन्नईच्या ज्या चेपॉक मैदानाच्या खेळपट्टीवर हा सामना होता ती खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे हे सर्वश्रुत आहे. ते पाहता खेळपट्टीवर दोन्ही डावखुरे फलंदाज असतील तर मुंबईला तिसऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज पडू शकते हे ध्यानात ठेवून बहुधा रोहित आपल्याला गोलंदाजी करावी लागणार या मानसिकतेतच होता.

योगायोगाने केकेआरच्या डावातील १४ व्या षटकात असेच घडले. चांगला स्थिरावलेला नितीश राणा व शकिब अल हसन हे दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानात होते म्हणून रोहितने गोलंदाजी केली. मुंबईला रोहितची ही गोलंदाजी चांगलीच महागात पडली असती; कारण पहिला चेंडू टाकतानाच त्याचा पाय मुरगळला असता पण सुदैवाने ती आपत्ती टळली आणि त्याने ते षटक टाकले. त्यापैकी एका चेंडूवर शकिब त्रिफळाबाद होता होता वाचलासुद्धा… दुसरे कारण म्हणजे कृणाल पांड्याला राखून ठेवण्यासाठी त्याला गोलंदाजी करणे आवश्यक वाटले असेल; कारण दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल हे खेळपट्टीवर असतील त्यावेळी कृणालच त्यांना आपल्या गती परिवर्तनाने आणि मंद चेंडूंनी रोखू शकतो अशी स्थिती होती. झालेही तसेच. रसेल तर दोनदा त्याच्या गोलंदाजीवर बाद होता होता वाचला.

एकूणच मंगळवारच्या सामन्यात सुरुवातीला ओईन माॕर्गनच्या कप्तानीने प्रभावित केले. त्यानंतर रोहित शर्मानेसुद्धा स्वतःसह आपल्या इतर गोलंदाजांचा चतुराईने वापर करत कप्तानीत आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आणि पराभवाचे रूपांतर विजयात केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button