का संयमी राऊतांचे पवारांना खडे बोल ?

Rahul Gandhi - Nitin Raut - Sharad Pawar.jpg

ऊर्जामंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध बोलण्यापूर्वी त्यांचे विरोधकदेखील दोन वेळा विचार करतात. त्यात राऊत हे राज्यात मंत्री आहेत आणि महाविकास आघाडीचे शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यातच शरद पवार यांच्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले नाही, ती हिंमत नितीन राऊत यांनी दाखवली. राऊत हे निष्ठावंत काँग्रेसजन आहेत. राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकदाही पक्ष सोडलेला नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात एक आश्वासक दलित नेता आणि प्रस्थापित मुकुल वासनिक ह्यांचा पर्याय म्हणून ते पुढे येत आहेत.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राहुल गांधी राजकारण करीत असल्याचा आरोप करीत आहेत. नेमके त्याच वेळी शरद पवार यांनीही राहुल गांधी यांच्या बयाणबाजीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नात, कोणीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असा सल्ला दिला. याचा अर्थ पवार यांनी मोदी- शहा यांच्या सुरात सूर मिसळला असा तर्क नितीन राऊत यांनी काढला आहे. शरद पवार हे काही मुद्द्यांवर मोदींचे समर्थन करतात हे आधीदेखील दिसून आले आहे.

सोमवारी वीजदरवाढी संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत राऊत यांना शरद पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी छेडले. माहिती अशी आहे की, पवारांच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया द्यावी, असा त्यांना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींचा निरोप होता. त्यामुळे पत्रकारांनी यासंबंधीचा प्रश्न विचारावा याची ते वाटच पाहात असावेत. पत्रकारांनी छेडताच निष्ठावंत राऊत यांनी खास नागपुरी स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली. पवार हे संरक्षणमंत्री होते, १९६२ च्या युद्धात भारताने काही भूभाग गमावला असे त्यांना वाटत होते तर तो परत मिळवण्यासाठी त्यांनी त्या मंत्रिपदाच्या काळात काय प्रयत्न केले, असा सवाल त्यांनी केला. पवार मूळ काँग्रेसचेच आहेत, आज ते यूपीएचे घटक आहेत. राहुल गांधी यांच्याकडून त्यांनी भूमिका समजून घ्यायला हवी होती, असेही राऊत म्हणाले. पवार यांचे गुरू दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण हे देशाचे मंत्री होते तेव्हा भारताने पाकिस्तानबरोबरचे युद्ध जिंकले याचा उल्लेख पवार यांनी केला असता तर आनंद झाला असता, शरद पवार हे काही मुद्द्यांवर मोदींचे समर्थन करतात हे आधीदेखील दिसून आले आहे.

नितीन राऊत हे स्वतःहून बोलले असल्याची शक्यता नाही. दिल्लीतील सूत्रानुसार त्यांना तसा स्पष्ट निरोप होता. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीसोबत काँग्रेस सत्तेत आहे. याचा अर्थ पवार यांनी आपल्या नेतृत्वावर कुठलीही टीका केली तर ती खपवून घ्यायची असा होत नाही. त्यामुळे ज्यावेळी पवार, संजय राऊत किंवा आणखी कोणी काँग्रेसवर हल्लाबोल करतील त्यावेळी त्याचे चोख प्रत्युत्तर दिलेच पाहिजे, अशी भूमिका आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. पवारांवर राऊत यांनी केलेली टीका हा त्याचाच परिपाक आहे.

महाराष्ट्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला महत्त्वाचे स्थान नाही, अशी खंत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केल्यानंतर खळबळ उडाली होती. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतरच्या विधानपरिषद निवडणुकीतही केवळ एक जागा दिली गेली. एकीकडे राज्यात सरकार चालवताना काँग्रेसला विश्वासात घ्यायचे नाही आणि दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर टीकेची संधी सोडायची नाही, असे जर राष्ट्रवादी व शिवसेनेकडून केले जात असेल तर आपण पण तेवढीच परखड प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे दिल्लीच्या काँग्रेस वर्तुळात ठरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादी व शिवसेनेकडून काँग्रेसला चिमटे काढणे, काँग्रेसची खिल्ली उडवणे किंवा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणे असा काहीही प्रकार झाला तरी काँग्रेस यापुढे शांत बसणार नाही. राऊत यांच्या वक्तव्यावरून तेच सूचित होते.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात काँग्रेसची तितकीच महत्त्वाची भूमिका होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस आमदारांची संख्या कमी असली तरी काँग्रेसशिवाय हे सरकार स्थापन झाले नसते आणि काँग्रेसने उद्या पाठिंबा काढून घेतला तर हे सरकार कोसळेल. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने काँग्रेसला कुठल्याही बाबतीत गृहीत धरू नये. काँग्रेसचा आत्मसन्मान दुखावला गेला तर दरवेळी त्याचे चोख उत्तर दिले जाईल, अशी भूमिका काँग्रेसश्रेष्ठींनी घेतली असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER