रात्रीची संचारबंदी फक्त राज्यातच का?

Night Curfew

Shailendra Paranjapeकोरोना (Corona) विषाणूचा नवा अवतार इंग्लंडमध्ये आढळल्याने महाराष्ट्रामध्ये महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रोगाचा फैलाव विश्वव्यापी झाला; पण परिणाम मात्र जगभर सारखेच झालेले नाहीत. त्यामुळे कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना थिंक ग्लोबली अँक्ट लोकली, याचं उदाहरण होतं. पण महाराष्ट्रात मात्र तसं झाल्याचं दिसत नाही. तरीही ५ जानेवारीपर्यंत लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदीचं (Night curfew) स्वागतच करायला हवं; पण ते करतानाच काही क्षेत्रातल्या धुरिणांनी उपस्थित केलेले प्रश्नही गैरलागू नाहीत. त्यांचीही उत्तरे मिळायला हवीत वा त्यांच्या शंकांचे निराकरण व्हायला हवेच.

देशपातळीवर ताजी आकडेवारी लक्षात घेतली तर कोरोना लागण झालेल्यांपैकी ९६ टक्के रुग्ण बरे होत आहेत. लागण झालेल्यांपैकी मृत्यू ओढवणाऱ्यांचे प्रमाणही केवळ दीड टक्क्यांवर आलेय. याचा अर्थ भारतातला कोरोना आता जीवघेणा राहिलेला नाही. १० लाख नागरिकांमागे होणारा प्रादुर्भाव, बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण या सर्व निकषांवर भारताची कामगिरी जगात सर्वोत्तम आहे, असं केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यानं जाहीर केलंय. तरीही संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रानं इंग्लंडमधल्या कोरोनाच्या नव्या अवताराची धास्ती घेतलीय आणि रात्रीची संचारबंदी लागू केलीय.

ती करताना शासनाची भूमिका काय असू शकेल, याचा विचार केला की, एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतेय. ती म्हणजे सणासुदीचा काळ संपत आलाय आणि आता फक्त दोन दिवसांतला नाताळचा सण, नववर्षाच्या स्वागतासाठी होणारे जल्लोष, त्यानंतर संक्रांतीचा सण इतकेच सण उरलेत. त्यामुळे नाताळला, नववर्षाला लोकांनी रात्री रस्त्यांवर हॉटेल्समध्ये आणि एकूणच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. त्यातून कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये, हा सरकारचा हेतू असू शकतो. त्यात डिसेंबमध्ये अमेरिका युरोपमधून बरेचसे भारतीय मायदेशी येत असतात. त्यामुळे पुन्हा नव्याने रोगाचा फैलाव होऊ नये आणि त्यात इंग्लंड, युरोपमधून विषाणूचा नवा अवतार महाराष्ट्रात येऊ नये, यासाठीही ही रात्रीची संचारबंदी योग्य आहे, असेच म्हणावे लागेल; कारण नंतर उपचार किंवा धावाधाव करण्यापेक्षा पूर्वकाळजी केव्हाही चांगलीच.

पुण्यातल्या ८०-८५ उद्योगांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यापारी समुदायाला या निर्णयामुळे फार फटका बसणार नाही; कारण रात्री ११ पर्यंत दुकानं बंद होतात; पण या निर्णयामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होईल आणि संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच ही रात्रीची संचारबंदी का, हे लक्षात येत नाही, असं रांका यांनी म्हटलंय. त्यांचा प्रश्न योग्य आहे आणि त्याचं निराकरण राज्य सरकारनं करायला हवं.

हॉटेलचालकांच्या संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी रात्रीची संचारबंदी मध्यरात्रीनंतर लागू करावी, अशी मागणी केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार या रात्री ११ वाजल्यापासूनच्या संचारबंदीमुळे व्यवसायात १५ टक्के घट होण्याची भीती आहे. त्यामुळे ती रात्री १२ वाजल्यानंतर करावी, असं म्हटलंय. नाट्यनिर्मात्यांनी समजूतदार भूमिका घेत रात्री ११ पर्यंत प्रेक्षकांसह सर्व जण घरी पोहचतील, अशा प्रकारे वेळा बदलू, असं नाट्यनिर्मात्यांनी ठरवलंय.

खरं तर मिशन बिगिन अगेनमध्ये केंद्र सरकारनं विविध क्षेत्रं खुली केली त्यावेळी महाराष्ट्रानं सर्वच क्षेत्रं काहीशी उशिरानं सुरू केली. पण तरीही आजही देशभरातल्या रुग्णांपैकी ४० टक्के केरळ आणि महाराष्ट्रातले आहेत, या वास्तवाकडे दुर्लक्ष करता येत नाही. तीच गोष्ट कोरोना मृत्यूंबद्दलही आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक लाइव्हनंतर लगेचच फेसबुक लाइव्ह करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रात्रीची संचारबंदी करून संचारबंदी करण्यात आघाडी घेतलीय. त्याचं स्वागत करू या आणि ५ जानेवारीपर्यंत निशाचर न होता घराघरांतच थांबू या.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

शैलेन्द्र परांजपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER