राफेल नदाल डाव्या हाताने का खेळतो?

Rafael Nadal

राफेल नदाल…जगातील या दुसऱ्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या टेनिसपटूचा खेळ बघून तुम्हाला वाटेल की हा डावखुरा खेळाडू आहे कारण तो खेळतो डाव्या हाताने..पण तुमचा हा समज चुकीचा आहे. खरे तर नदाल हा ‘अम्बीडेक्स्ट्रस’ व्यक्ती आहे म्हणजे तो असा व्यक्ती आहे जो आपल्या दोन्ही हातांचा पुरेपूर वापर करतो. तो टेनिस खेळतो डाव्या हाताने पण इतर सर्व गोष्टी करतो उजव्या हाताने.

नैसर्गिकरित्या तर ‘राफा’ हा उजव्या हातीच व्यक्ती आहे. असे असतानाही जो आपला सहज हात नाही त्या डाव्या हाताने खेळत ‘राफा’ टेनिसमध्ये एवढा यशस्वी ठरलाय ही आश्चर्याची बाब आहे. अशी आश्चर्यकारी कामगिरी केवळ ‘राफा’ च करु शकतो असे टेनिसप्रेमींचे मत आहे.

ऑलिम्पिक साठी जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

टेनिसमध्ये डावखुरे खेळाडू मोजकेच आहेत मात्र जे मोजकेच आहेत ते चांगलेच यशस्वी ठरले आहेत. रॉड लेव्हर, मार्टिना नवरातिलोव्हा, जॉन मोकेन्रो, जिमी कॉनर्स आणि गोरान इवानिसेवीच ही नावे याची पुष्टी करतात.

टेनिसमध्ये डावखुरे खेळाडू खेळण्यासाठी इतरांना अवघड का जातात याची कारणे आहेत. बहुतांश टेनिसपटू उजव्या हाताने खेळणारे असतात, त्यामुळे चांगला डावखुरा खेळाडू त्यांच्या कमजोर बॅकहँडवर आक्रमण करु शकतो. शिवाय तो कोर्टच्या उजव्या बाजूने अधिक ‘वाईड’ सर्व्हिस करु शकतो.

‘राफा’ ने डाव्या हाताने खेळायचे हेच कारण आहे का? हे एक कारण आहे पण इतरही काही कारणे आहेत जसे की, राफाचे काका व प्रशिक्षक टोनी नदाल यांनी त्याला डाव्या हाताने खेळायचा सल्ला दिला. याबाबत टोनी यांनी एका मुलाखतीत दिलेली माहिती अशी की, बालपणी राफा दोन्ही हातांनी टेनिस खेळायचा. पण त्याचा डावा हात अधिक मजबूत असल्याचे टोनी यांना दिसून आले. तरीसुध्दा टोनी यांनी त्याला डाव्या हातानेच खेळायचे बंधन घातलेले नव्हते. फक्त आपला जो हात अधिक मजबूत आहे त्याचाच अधिक वापर कर असा सल्ला त्यांनी त्याला दिला होता. याचे कारण असे होते की कोणताही आघाडीचा व यशस्वी खेळाडू दोन्ही हातांनी फोरहँड फटका खेळत नाही आणि आपला शिष्य तसा पहिला खेळाडू ठरू नये असे त्यांना वाटत होते.

टेनिस सोडून राफा आपली इतर सर्व कामे उजव्या हाताने करतो पण टेनिस डाव्या हाताने खेळले तर चांगले असे त्याला वाटते. अजुनही राफा उजव्या हाताने चांगली सर्व्हिस आणि दमदार फोरहँड मारू शकतो.

राफा स्वतः म्हणतो की मी राईटी आहे की लेफ्टी हे सांगणे फारच अवघड आहे. पण टेनिस खेळताना मी उजवा हात कधीच वापरत नाही. डाव्या हातानेच खेळायला चांगले जमते असे मला वाटते. उजव्या हाताने मी एवढाच यशस्वी ठरलो असतो का, याची कल्पना करणे अवघड आहे.