पश्चिम बंगाल,आसाममध्ये अधिक टप्प्यात मतदान का? – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी काही प्रश्न उपस्थित केले. तीन राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान होत आहे आणि पश्चिम बंगाल, आसाम या दोन राज्यांत अधिक टप्प्यात मतदान का घेतले जात आहे? या मागचा डाव काय? असा प्रश्न त्यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “केरळ १४०, तामिळनाडू २३४ आणि पुद्दूचेरीत ३० हे तिन्ही राज्य मिळून एकूण ४०४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मग आसाममध्ये १२६ आणि पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी दोन्ही राज्यांत एकूण ४२० जागांसाठी ७ आणि ८ टप्प्यात मतदान होत आहे. दोन राज्यांसाठी एवढ्या टप्प्यांची काय गरज आहे? या मागे काही कुटील डाव आहे का?” असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली होती. “मी निवडणूक आयोगाचा आदर करते, जिल्ह्यांची विभागणी का केली? पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी ३ टप्प्यात मतदान विभागण्यात आले आहेत. हे मोदी, शहांच्या सोयीनुसार करण्यात आले आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला होता. राज्य सरकारच्या निवडणुकीत केंद्र सरकार आपल्या मंत्रीपदाचा आणि सत्तेचा गैरवापर करू शकत नाही. त्यांनी असे केले तर त्यांची खूप मोठी चूक असेल. त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्ही सामान्य लोक आहोत. आम्ही आमचे युद्ध लढू. निवडणूक आयोगाला विनंती करतो की, त्यांनी पैशांचा दुरुपयोग थांबवावा. भाजपाने पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध मार्गांनी पैसे पाठवले,” असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले होते.

निवडणुका कुठे व कधी

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्याचे मतदान २७ मार्चला होणार . दुसऱ्याच टप्प्याचे मतदान 1 एप्रिलला होणार आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान ६ एप्रिलला होणार. २ मे ला निकाल लागणार.

केरळमध्ये आणि तामिळनाडूत एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात ६ एप्रिलला मतदान होणार आणि २ मे ला मतमोजणीनंतर निकाल लागणार. तामिळनाडूत ६ एप्रिलला मतदान होऊन २ मे ला निकाल लागणार.

पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात मतदान होणार आहे. ६ एप्रिलला मतदान होऊन २ मे ला निकाल लागणार.

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – २७ मार्च, ३० जागा
दुसरा टप्पा – १ एप्रिल, २० जागा
तीसरा टप्पा – ६ एप्रिल, ३१ जागा
चौथा टप्पा – १० एप्रिल, ४४ जागा
पाचवा टप्पा – १७ एप्रिल, ४५ जागा
सहावा टप्पा – २२ एप्रिल, ४३ जागा
सातवा टप्पा – २६ एप्रिल, ३६ जागा
आठवा टप्पा – २९ एप्रिल, २५ जागा
मतमोजणी आणि निकाल – २ मे ला होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER