मुख्यमंत्री का करत आहेत वारंवार बेरोजगारी आणि लॉकडाऊनचा उल्लेख? जनतेच्या मनात दहशत निर्माण होतीय का?

Maharashtra Today

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलीये. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यावर उपाय म्हणून राज्यातल्या आठ जिल्ह्यात निर्बंध लावणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिलेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अंशतः निर्बंध लागू ही करणय्ता आलेत.

कोरोनाच्या (Corona)वाढत्या प्रसारामुळं नागरिक, व्यापारी, चाकरमानी चिंतेत आहेत. अशा परिस्थीतीत मुख्यमंत्र्यांनी (CM Thackeray)फेसबूक लाइव्ह घेत जनतेला संबोधन केलं. यावेळी त्यांनी जगभरातली परिस्थीती आणि महाराष्ट्रातल्या उपाय योजना यासंबंधी माहिती दिली. फान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. ब्राझीलमध्ये नागरिकांच्या नोकऱ्या गेल्यात हे त्यांनी सांगितलं. संवादाच्या सुरुवातीला “मी तुम्हाला घाबरवायला आलेलो नाही.” असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रवाही बोलण्यात असे मुद्दे मांडले ज्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात दहशत निर्माण होण्याच्या शक्यतेला बळ मिळालं असतं.

“मला व्हिलन ठरवलं तरी चालेल”

“राज्यातील स्थिती भीतीदायक असली तरी आपण सत्य समोर आणतोय.. इतर राज्यात निवडणुका असो किंवा काय तिकडे कोरोना नाही असं विचारलं जातं, पण मला त्या राज्यांचं पडलेलं नाही, मला महाराष्ट्र प्यारा आहे. आम्ही सत्यच सांगत राहू, मग मला व्हिलन ठरवलं तरी चालेल.” असं विधान मुख्यमंत्र्यांनी लाइव्हमध्ये केलं. नंतर त्यांनी फ्रान्स, ब्राझील, पोर्तूगालची परिस्थीती सांगितली.

“फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन, ब्राझीलमध्ये नोकऱ्या गेल्यात”

“अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू, या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे. हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलोय. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवलं तर अनर्थ घडतोय” असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला.

राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाविकास आघाडी (MVA)अपयशी ठरलीये. राज्यात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याच्या सुर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा वारंवार दिसून आला. असं राजकीय विश्लेषक म्हणतायेत. मुख्यमंत्र्यांनी युरोपातील देशांची स्थिती सांगितली. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करण्यात आलंय, ब्राझीलमध्ये मृत्यूदर वाढलेत, लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. पोर्तूगालमध्ये कोरोना उद्रेक झालाय. हे दाखले दिलेत. यावरुन मुख्यमंत्री लॉकडाऊन घोषित करण्याआधीची पार्श्वभूमी मांडायला आले होता का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

असंवेदनशील भाषा

“काल परवा होळी संपली आणि राज्यात शिमग्याला सुरुवात झाली.” मुख्यमंत्र्यांचं हे विधान कोरोनाच्या पार्श्वभूमीला धरुन पाहिलं तर अजिबात संवेदनशील नसल्याचं राजकीय विश्लेषकांच मत आहे.

जनतेस जबाबदार धरणं कितपत योग्य?

मुख्यमंत्री वारंवार नागरिकांनी नियम पाळले नाहीत, पार्ट्या सुरु होत्या, नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी असं म्हणत होते. सरकारनं कोरोना रोखण्यासाठी चालवलेली कॅम्पेनसुद्धा ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी होती’ यावर टीका करताना विरोधकांनी सरकार जबाबदारीपासून पळतंय का? असा सवाल उपस्थीत केला होता. कोरोना लसीकरणाच्या वाटपाचा वेग कमी आहे. या गोष्टी असताना सुद्धा उद्या लॉकडाऊन लागला तर याला जबाबदार नागरिकच असतील असं म्हणत लॉकडाऊनचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेत.

विरोधक आक्रमक

मुख्यमंत्र्यांच्या लाइव्हवर विरोधकांनी सडकून टीका केलीये. “मुख्यमंत्र्यांनी लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवून घाबरवणे बंद करावं. मुख्यमंत्री काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आहेत का? मुख्यमंत्र्यांनी खुर्चा सोडून रस्त्यावर उतरले पाहिजे,” अशी टीका गोपीचंद पडळकरांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केली.

“मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

“जनतेला त्रास देणारं महाराष्ट्र एकमेव राज्य- फडणवीस”

“राज्यातील जनतेला मदत न करणारं हे देशातील एकमेव सरकार आहे. केंद्र सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. इतर राज्यांनीही पॅकेज जाहीर केलं. पण या सरकारने काहीच केलं नाही. उलट लोकांची वीज कापली आणि लोकांना त्रास दिला. कोविड काळात लोकांना त्रास देणारं हे एकमेव सरकार आहे,” अशी टीकाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली.

लॉकडाऊनच्या विरोधात विरोधकांनी ठामपणे विरोधाची भूमिका घेतलीये. राज्यात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी आरोग्य आणि अर्थ या दोन्ही आघाड्यांवर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिवाय उपाय योजना कराव्यात असा नागरिकांचा सुर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button