का लढत आहे शिवसेना बिहारची निवडणूक?

Bihar Election2020

शिवसेनेचे (Shivsena) खासदार आणि सामना (Samanna) या मुखपत्राचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधानही होऊ शकतील, असे विधान केले होते. महाराष्ट्राबाहेर नगण्य अस्तित्व असलेली शिवसेना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका कशी वठवू शकेल आणि या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधान कसे होऊ शकतील, असा सवाल त्यावेळी केला गेला. सोशल मीडियात राऊत यांचे विधान खूप ट्रोलदेखील झाले होते.

प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे धुमारे फुटणे हे नवीन नाही. एकेकाळी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत केंद्रात असायचे आणि प्रादेशिक पक्षांच्या मदतीची काँग्रेसला गरज नसायची. १९७७ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसला पर्याय म्हणून अनेक पक्षांच्या विलिनीकरणातून तयार झालेला जनता पक्ष सत्तेत आला. नव्वदच्या दशकात जनता दल-भाजपचे सरकार आले आणि तिथून पुढे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढत गेले. गेली काही वर्षे भाजपप्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेसप्रणित युपीए असे चित्र निर्माण झाले आणि प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढत गेले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आणि त्यांची शिवसेना त्यास अपवाद होती. कधीही दिल्लीत न जाणारा महाराष्ट्रातील वाघ अशी बाळासाहेबांची प्रतिमा होती. देशातील बडे नेते मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटत असत. नाही म्हणता वर्षानुवर्षे मुंबईत राहणाऱ्या काही परप्रांतिय कार्यकर्ते, नेत्यांनी त्यांच्या राज्यात शिवसेना रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यातून बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आदी राज्यांमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लढविण्याचाही प्रयत्न झाला पण एकही आमदार शिवसेनेला निवडून आणता आला नाही. हिंदुत्वाच्या व्यापक विषयाला हात घालणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्र वगळता बाहेर कुठेही प्रभाव पाडता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हाही एका अर्थाने महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला प्रादेशिक पक्ष. मात्र, काही तारिक अन्वर, पी.ए.संगमा, विद्याचरण शुक्ला, शंकरसिंह वाघेला  यांच्यासारख्या काही नेत्यांच्या मदतीने बºयापैकी अस्तित्व निर्माण केले, अगदी केरळमध्येही विधानसभेत प्रवेश मिळविला होता. जे राष्ट्रवादीला काही प्रमाणात का होईना पण जमले ते शिवसेनेला आजही जमलेले नाही.

तृणमुल काँग्रेस, अकाली दल, राजदसारख्या प्रादेशिक पक्षांनी अन्य जवळच्या राज्यांमध्ये पाय पसरण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला पण तेथील मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही.

आता बिहारमध्ये विधानसभेच्या (Bihar Election) तब्बल ५० जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. २०१५ निवडणुकीत तिथे शिवसेनेने ८० जागा लढविल्या होत्या आणि फक्त २ लाख ११ हजार मते प्राप्त करता आली होती. ही मते नगण्य होती. तरीही यावेळी ५० जागा शिवसेना लढवतेय. जदयु-भाजपची सत्ता असलेल्या बिहारमध्ये राजद-काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. याहीवेळी शिवसेनेची डाळ शिजण्याची शक्यता नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत की त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे  आता पक्ष राष्ट्रीय पातळीवर नेण्याची इच्छाआकांक्षा निर्माण झालेली दिसते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरची राज्याबाहेरची शिवसेनेची ही पहिलीच निवडणूक असेल आणि म्हणूनच शिवसेनेसाठी ती प्रतिष्ठेची राहील. पण ज्या राज्यात कुठलाही जनाधार नाही तिथे निवडणूक लढण्याची घाई शिवसेना का करीत आहे? एकतर या निमित्ताने आम्ही महाराष्ट्राबाहेरही जाऊ शकतो, भाजपला त्रास देऊ शकतो हे शिवसेनेला दाखवायचे असावे.

केंद्रीय राजकारणात प्रभाव निर्माण करायचा तर महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये अस्तित्व दाखवावेच लागेल याची शिवसेनेला कल्पना आली असावी आणि त्यातूनच बिहारमध्ये लढण्याचा अट्टाहास केला गेला असावा. त्यात यश मिळणार नाही याची कल्पना शिवसेना नेतृत्वाला नक्कीच असणार पण भाजपबद्दलचा राग महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेला व्यक्त करायचा असेल तर त्यांना कोण रोखू शकेल? त्याऐवजी महाराष्ट्रात काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी या ‘मित्र’पक्षाकडून होत असलेली कोंडी, राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व हे सगळे रोखण्याचे जोरकस प्रयत्न करण्यावर शिवसेनेने शक्ती खर्च केली तर ते अधिक फायद्याचे ठरेल.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER