संजय राऊत यांचा निशाणा अजित पवारांवर का ?

Sanjay raut & Ajit Pawar

शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना सोडून  कोणावरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करण्याची मुभा संजय राऊत यांनी स्वत:च स्वत:ला दिलेली दिसते. त्यांच्या शब्दांच्या फटकाऱ्यातून कोणीही वाचत नाही. अगदी धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हेही. याचा अनुभव गुरुवारी आला. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असतानाही पुण्यात लॉकडाऊन घाईघाईने उठविण्यात आला’ असे सांगत त्यांनी लॉकडाऊन उठविल्याबद्दल उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटर सुसज्ज आहेत, व्यवस्थित सुरू आहेत, पुण्यात मात्र काही सुविधांचा अभाव दिसतो, असे वक्तव्यही त्यांनी पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी केले. वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने रायकर यांचा मृत्यू झाला होता.

संजय राऊत यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पुण्यात अजित पवार कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. असे असताना राऊत यांनी त्यांची पाठराखण करणे अपेक्षित होते. राज्य सरकार केवळ मुंबईतील सुविधांकडे लक्ष देत आहे आणि पुण्याकडे सरकारचे साफ दुर्लक्ष असल्याची टीका विरोधी पक्ष भाजप करीत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याच्याच विचाराचे आहेत. अजित पवार यांनी पुण्यात सगळं काही खुलं केलेलं नाही. साधारणत: मुंबईत ज्या नागरी सुविधा उघड्या आहेत त्याच पुण्यातही आहेत. असे असताना पुण्यात घाईघाईने लॉकडाऊन उघडल्याचा आरोप फारसा तथ्याला धरून नाही. लॉकडाऊनच्या नावाखाली रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं बंद ठेवण्याच्या सरकारच्या भूमिकेबद्दल मुंबईत तीव्र असताना राऊत यांनी त्याची दखल घेतली तर अधिक बरे होईल. तसेही राऊत यांना जगातील कोणत्याही विषयावर बोलण्याचा अधिकार आहेच. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही टीका करू नये. नाहीतर, ‘टीका करणाऱ्यांना काय कळतं’ असं उत्तर ते देतील.

पुण्यातील परिस्थिती निश्चितच गंभीर आहे पण उभ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भयावह परिस्थिती आहे. तालुका, जिल्ह्यांच्या ठिकाणी व्हेंटिलेटर्स, ॲाक्सिजन सिलिंडर्सचा प्रचंड तुटवडा आहे. बेड्स उपलब्ध नाहीत. माणसं बेमौत मरत आहेत. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये डेडबॉडीज ठेवायला जागा नाही. सरकारी यंत्रेणेचे पार धिंडवडे उडाले आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. या सगळ्याबाबत रोखठोक लिहित सरकारचे कान टोचण्याची गरज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER