योगींनी लोकशाहीचा गळा घोटला तरीही मोदी गप्प का? – संजय राऊत

PM Modi-Yogi Adityanath

मुंबई : हाथरसमध्ये (Hathras case) पीडित मुलीचा मृतदेह जाळला गेला. यातून स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडतो आणि रामराज्य म्हणवलं जातं; पण ही दुर्दैवी घटना पाहता सीतामाईसुद्धा आक्रोश करत असेल, असे म्हणत उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. रामाच्या भूमीत सर्व नियम आणि कायदे उधळून लावले आहेत.

हाथरसच्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गप्प का? अशी संतापजनक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच पंतप्रधानांनी देशातील जनतेला विश्वासात घेऊन या प्रकरणातील सत्य सांगावं, अशी मागणीही त्यांनी केली. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आपली भूमिका राऊत यांनी स्पष्ट केली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हाथरसच्या घटनेवरून भाजपचा जोरदार समाचार घेतला.

हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरे तर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेबाबत सत्य सांगावं. हाथरसच्या घटनेमुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांना त्यावर संताप व्यक्त करायचा आहे; पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोक मौन बाळगून आहेत. हाथरससारख्या घटना घडल्यावर मीडियाने सत्य काय आहे ते सांगायला हवं. जे घडलं ते जनतेसमोर आणायला हवं. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत नाही. त्यामुळे मीडियाला घटनास्थळी जाण्यास परवानगी द्यायला हवी, असं सांगतानाच २ वाजता रात्रीच्या काळोखात हाथरसच्या कन्येचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आला. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. ज्यांना जर हे अंत्यसंस्कार वाटत असतील तर त्यांनी हिंदू धर्माचे ग्रंथ आणि पोथ्या वाचाव्यात. अंत्यसंस्काराबाबत आपल्या धर्मात काही वचनं आहेत. मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

हिंदुत्ववादी सरकारने या पोथ्या वाचाव्यात, असा टोलाही त्यांनी योगी सरकारला लगावला. योगी आदित्यनाथ भगवे कपडे परिधान करतात. ते संन्यासी आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आणि पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशात सीतामाईची पूजा केली. आज सीतामाईही हाथरसच्या कन्येच्या किंकाळ्या ऐकून व्यथित झाली असेल. पुन्हा धरणी दुभंगून मला पोटात घ्या म्हणत असेल, असंही ते म्हणाले. एका अभिनेत्याने मुंबईत आत्महत्या केली. त्याला हत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला. हाथरसमध्ये बलात्कारपीडितीने तिच्यावर बलात्कार झाल्याचं कॅमेऱ्यासमोर सांगितलं. तरीही तिच्यावर बलात्कार झालाच नसल्याचे उत्तरप्रदेश पोलीस सांगत आहेत. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली. एका नटीचं अनधिकृत बांधकाम पाडलं म्हणून तिच्या स्वागतासाठी विमानतळावर उभे असलेले दलित नेते आता कुठे आहेत? दलित नेते कुठे गेलेत त्याची खरं तर एसआयटीमार्फत चौकशी केली पाहिजे, असं सांगतानाच हाथरसप्रकरणी कंगना रणौतचं तोंड बंद का आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ज्या पद्धतीनं उत्तरप्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत धक्काबुक्की केली, ते ठीक नव्हतं. त्याचं देशात कोणीही समर्थन करणार नाही. राहुल गांधी हे इंदिरा गांधींचे नातू आणि राजीव गांधी यांचे पुत्र आहेत हे विसरून चालणार नाही. या लोकांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेली धक्काबुक्की म्हणजे लोकशाहीचा गँगरेप आहे. या धक्काबुक्कीचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER