नेत्यांच्या अकाली जाण्याचा महाराष्ट्राला असा शाप का?

- प्रमोदजी, विलासराव, श्रीकांतदादा, आबा, मुंडे अन् आता सातव

Maharashtra Today

मुंबई :- मन आज विषण्ण झाले आहे. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सातव (Rajeev Satav) यांचा बळी कोरोनाने घेतला. एक दिलदार, संयमी आणि विनम्र नेत्याची अखेर झाली. काँग्रेसचे नेते राहुल (Rahul Gandhi) यांचा डावा हात अशी सातव यांची ओळख होती. अत्यंत निष्ठावान काँग्रेसी होते ते. गेले २०-२२ दिवस मृत्यूशी झुंज देत होते, ती आज संपली. बहुजन समाजातील हा एक अत्यंत विनयशील नेता होता. राजकारणासाठी राजकारण करीत टीका करीत बसायचे असली कामे त्यांनी केली नाही. आई रजनीताई सातव यांचा संस्कार त्यांच्यावर होता आणि काँग्रेसच्या उच्च परंपरांचे ते सच्चे पायिक होते.

सातव यांच्या निधनाचे वृत्त येताच सोशल मीडियात (Social Media) त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या मेसेजेसचा खच पडला. अशी माणसे किती आणि कशी वेगळी असतात हे त्यांच्या मृत्यूनंतर अधिक ठळकपणे जगासमोर येत असते. जिवंतपणी त्यांच्यातील गुणांची कदर करून त्यांना योग्य स्थान मिळवून देण्यात हा समाज कमी पडतो का हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांना नक्कीच संधी दिली. राहुलजींनी त्यांना राज्यसभेवर पाठविले. गुजरातची जबाबदारी दिली. सातव हे माळी समाजाचे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात निर्णायक अशी मतदारसंख्या असलेला हा समाज. मात्र आजही या समाजाला म्हणावे तसे स्थान सत्तेत मिळत नाही. सातव हे या समाजाचे होते पण जातीपलिकडे जावून त्यांनी राजकारण केले.

असा राजबिंडा नेता कोरोनाचे (Corona) आपल्यातून हिरावून घेतला. सदैव हसतमुख, बावनकशी काँग्रेसनिष्ठा तरी इतर राजकीय विचारांचा सन्मान राखण्याचा स्थायीभाव ही त्यांची वैशिष्ट्ये होती. असा उमदा माणूस गेल्यानंतर स्मृतींच पट उलगडला गेला. काँग्रेसचे एक  अत्यंत हुशार, प्रतिभावंत नेते डॉ.श्रीकांत जिचकार (Srikant Jichkar) यांचा काही वर्षांपूर्वी नागपूरनजीक भीषण अपघातात मृत्यू झाला होता. श्रीकांतदादा हे हजारो युवकांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांनी खरेतर असाध्य अशा कर्करोगावर मात केली व अमेरिकेतून ते भारतात परतले पण रस्ते अपघातात ते गेले, त्या दिवशी महाराष्ट्र हळहळला. श्रीकांतदादा असते तर पुढे मुख्यमंत्री झाले असते.

महाराष्ट्रातील सामान्य माणसांशी नाळ जुळलेले चार मोठे नेतेही असेच अकाली गेले. एक म्हणजे भाजपचे चाणक्य अशी ज्यांची ओळख होती ते मुलुखमैदानी तोफ प्रमोद महाजन (Pramod Mahajan). पंतप्रधान पदासाठीचे गुण (पीएम मटेरियल) असलेला हा नेता होता. प्रचंड दूरदृष्टी, हाती घेतलेले मिशन पूर्ण करण्याची अफाट धडाडी त्यांच्या ठायी होती. मात्र कौटुंबिक कलहात त्यांच्या भावानेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि एका चौफेर व्यक्तिमत्वाची दुर्देवी अखेर झाली. लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री म्हणून स्वत:ची अमीट छाप निर्माण करणारे आर.आर.पाटील (R. R Patil) यांच्यावर कर्करोगाने काळाच्या रुपात येऊन घाला घातला.  लोकनेते, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे मोदी सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते आपल्या लाखो चाहत्यांना भेटण्यासाठी बीड-परळीत जाणार होते पण पहाटे पहाटे दिल्लीतील एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.  हे नेते आज हयात असते तर महाराष्ट्राचे राजकारण वेगळेच राहिले असते. तिन्ही नेत्यांकडे अजूनन १५-२० वर्षांची राजकीय इनिंग बाकी होती. महाराष्ट्राला दिशा देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. लाखो चाहत्यांना शोकसागरात लोटून हे लोकनेते आपल्यातून निघून गेले.

नेत्यांचे असे अकाली निघून जाणे हे त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर राज्यातील जनतेचे अपरिमित नुकसान असते. राजकारणात सर्वांना सोबत घेऊन पुढे जात, समाजाशी नाळ जुळवून ठेवत आणि स्वत:ची प्रतिमा जपत मोठे झालेले नेते जेव्हा अकाली निघून जातात तेव्हा अख्ख्या समाजाला एक पोरकेपण येते. राजीव सातव यांच्या निधनाने असेच पोरकेपण आज आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button