जयंत पाटील एवढे का संतापले आहेत?

Jayant Patil - Maharashtra Today

मुंबई :- राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षदेखील आहेत. त्यांच्याकडे मंत्रिपद आणि पक्ष अशी दुहेरी जबाबदारी आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटील हेच गृहमंत्री होतील असे मानले जात होते. मात्र, सर्वांशी जुळवून घेणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही चालतील असे दिलिप वळसे पाटील हे गृहमंत्री झाले. त्या आधी वळसे पाटील यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि कामगार ही दोन महत्त्वाची खाती होती. ती अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे गेली. त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे केवळ जलसंपदा हेच खाते आजही आहे. सध्या जयंत पाटील हे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sataram Kunte) यांच्यावर चांगलेच संतापलेले आहेत. वादग्रस्त आयएएस अधिकारी विजयकुमार गौतम हे जलसंपदा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव होते. राष्ट्रकूल क्रीडा घोटाळ्यात त्यांची चौकशी सुरू आहे.

माहिती अशी आहे की जयंत पाटील आणि गौतम यांचे जलसंपदा विभागात चांगले ट्युनिंग होते. त्यामुळे गौतम हे ३० एप्रिलला निवृत्त झाल्याबरोबर त्यांची पुढील एक वर्षासाठी विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती जयंत पाटील यांनी करवून आणली. त्यांना सचिवपदाचा दर्जा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे त्यांनी त्यासाठी फारच आग्रह धरला होता असे म्हणतात.

मंत्रिमंडळाच्या गेल्या आणि कालच्या बैठकीत जयंत पाटील हे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर चांगलेच भडकल्याच्या बातम्या आल्या आहेत. पाटील एवढे अस्वस्थ का आहेत? कुंटे यांच्यावर त्यांचा इतका राग का म्हणून या बाबत विभागात उलटसुलट चर्चा आहे. असे म्हणतात की जलसंपदा विभागाच्या काही प्रकल्पाच्या फाईली (प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता आदींसाठी) वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या. अन्य काही आर्थिक फायलीदेखील होत्या. वित्त विभागाने त्यास मंजुरी दिली आणि पुढील कार्यवाहीसाठी त्या फायली मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे गेल्या. पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी त्या फायली वित्तविभागाकडे पुनर्विचारार्थ पाठवून दिल्या. असे म्हणतात की पाटील हे सातत्याने मुख्य सचिवांना का टार्गेट करीत आहेत याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या. जलसंपदा विभागाचे काही प्रस्ताव वादग्रस्त होते. प्रकल्पांच्या किमती सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाढविण्याचे प्रयत्न सुरू होते. कुंटे यांनी त्यास पायबंद घातला हे मंत्री आणि कुंटे यांच्यातील वादाचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतप्त असल्याची माहिती आहे. असले प्रकार मी खपवून घेणार नाही असा ‘निरोप’ त्यांनी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button