देशमुख-परमबीर प्रकरणात काँग्रेस का घेतेय सावध भूमिका?

Deshmukh-Parambir case - Maharastra Today

पश्चिम बंगालच्या काँग्रेस प्रचारात शरद पवारांनी (Sharad Pawar) येऊ नये अशा बातम्या झळकल्या आणि आघाडीतल्या बिघाडीवर पुन्हा प्रकाश पडल्याचं बोललं जातंय.. राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंहांनी गंभीर आरोप केले. घडल्या प्रकरणामुळं राष्ट्रवादी बॅकफुटवर आहे. यातून मार्ग काढण्यासाठीचे प्रयत्न सुरुयेत. राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सोबत असणाऱ्या काँग्रेसनं मात्र या प्रकरणात सावध भूमिका घेतलीये.

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप झाल्यामुळं राज्यातलं राजकारण ढवळून निघालं. पवारांनी पत्रकार परिषदांचा सपाटा लावला. शिवसेनेच्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) बऱ्याचदा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलीयेत. पण या सर्व चित्रात काँग्रेस मात्र कुठं दिसत नाहीये.

परमबीर सिंहांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) ट्वीट करुन उत्तर दिलं होतं, ते म्हणाले होते, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट होत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे,”

काँग्रेसची भूमिका

काँग्रेसनं या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. सध्या चर्चले जाणारे मुद्दे मुळात काँग्रेसच्या मंत्र्यांसंबंधी नाहीत. मुख्यमंत्रीपद सेनेकडे आहे. त्यामुळं उगाच टिकेचा धनी होण्यात काँग्रेसला काही फायदा नसल्यानं काँग्रेस या सर्वापासून अलिप्त आहे.

काँग्रेस नेत्यांची भूमिका मंत्रीपद सांभाळण्यापुरती आहे. शक्यता नसताना सत्ता नशिबी आली असताना मतदार संघ आणि मंत्रीपद जपण्याला काँग्रेस नेते प्राधान्य देत असल्याचं वरिष्ठ पत्रकारांचं म्हणनं आहे. कोरोनामुळं बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या नाहीतर आघाडीतली धुसफूस समोर आली असती. राज्यात काँग्रेसकडे मोठा चेहरा नाही. त्यामुळं आघाडी धर्म पाळण्याच्या भूमिकेत काँग्रेस नेते दिसतायेत.

बाळासाहेब थोरात म्हणात चांगल्या प्रकारे चौकशी व्हावी

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) गृहमंत्र्यांची पाठराखण केली होती.” अधिकाऱ्याचं पत्र आलं की लगेच राजीनामा घ्यायचा का?” असा सवाल ही त्यांनी उपस्थीत करत ते म्हणाले होते, “अधिकाऱ्याने पत्र दिलं, मंत्र्याचा राजीनामा घ्यावा असं आम्हाला वाटत नाही. राष्ट्रवादीचे नेते, मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चेशी सुरू आहे. यामध्ये सरकारची प्रतिमा खराब होण्याचं कारण नाही. एक घटना आहे. चौकशी व्हावी या मताचे आम्ही आहोत. चांगल्या पद्धतीने चौकशी व्हावी,” महाविकास आघाडीतल्या तिनही घटक पक्षातल्या नेत्यांची चर्चा झालेली नाही. हे षडयंत्र असल्याचं आम्हाला वाटतं. भाजपचा सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न असू शकतो. असं ही थोरात म्हणत होते.

विदर्भातला राष्ट्रवादीचा विस्तार काँग्रेसची ताकद घटवू शकते

अनिल देशमुखांना गृहमंत्री केलं तर विदर्भात राष्ट्रवादी वाढीस लागेल असा पवारांचा अंदाज होता. मात्र देशमुखांची प्रतिमा आरोपांमुळं डागाळली आहे. त्यामुळं पक्षविस्ताराच्या आशा संपल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याच मत राजकीय विश्लेष्क व्यक्त करतायेत. अनिल देशमुखांवर होणारे आरोप हे एका अर्थी काँग्रेसच्या पथ्यावर पडतील अशी चिन्ह आहेत. विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस थेट लढाई आहे. राष्ट्रवादीचा शिरकाव विदर्भात झाला तर काँग्रेसची ताकद विदर्भात कमी होईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रवादीच्या मलिन प्रतिमेचा बंगाल निवडणूकींवर परिणाम होऊ नये म्हणून

पश्चिम बंगाल काँग्रेसचे नेते, राज्यसभा खासदार प्रदिप भट्टाचार्य यांनी पवारांना इमेल टाकत पश्चिम बंगाल निवडणूकीत पवारांनी प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केलीये. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधीपक्ष आहे. राज्यात पवारांच्या राष्ट्रवादीवर होणारे आरोप आणि त्यामुळं त्यांच्यावर होणारी टीका यामुळं देशभर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झालीये, त्याचा फटका पश्चिम बंगाल निवडणूकीत बसू नये, म्हणून पश्चिम बंगाल काँग्रेसनं ही मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER