भाजपसाठी का प्रतिष्ठेची आहे हैदराबादची निवडणूक? – ओवेसी का करताहेत भडक भाषणं?

Owasi & BJP

तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ डिसेंबरला होत आहे. खरेतर एका छोट्या राज्याच्या मोठ्या शहराची ही निवडणूक. आजपर्यंत येथील निवडणुकीची फारशी चर्चा देशात वगैरे झाल्याचे स्मरत नाही, पण यावेळी देशभर चर्चा आहे. सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समिती, भाजप आणि असदुद्दिन ओवेसी यांचा एमआयएम हे लढतीतील प्रमुख पक्ष आहेत. राज्यात टीआरएस आणि एमआयएमची सत्ता आहे. विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्ष युती करून लढले होते पण यावेळी युती नाही मात्र मैत्रिपूर्ण लढती दोघांमध्ये होत आहेत.

जुने हैदराबाद शहर हा एमआयएमचा गड मानला जातो, तिथे टीआरएसचे उमेदवार नाहीत.१५० नगरसेवक निवडून देण्यासाठीची ही निवडणूक भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्यावेळी केवळ पाच नगरसेवक निवडून आणलेल्या भाजपने यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज प्रचारात उतरले आहेत.दक्षिणेतील राज्यांमध्ये घट्ट पाय रोवण्याचे नियोजन करीत असलेल्या भाजपसाठी हैदराबाद हे गेट वे आहे. दक्षिणेच्या राज्यांचा विचार केला तर भाजप अजूनही कर्नाटकच्या समोर सरकू शकलेला नाही. तमिळनाडूमध्ये आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि तिथे सत्तारुढ अण्णा द्रमुकबरोबर युतीची घोषणा भाजपने आधीच केली आहे.

एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्या विद्वेषपूर्ण भाषणांनी हैदराबादचे वातावरण सध्या तंग आहे. धार्मिक किनार प्रचाराला दिली तर त्याचा एमआयएमला फायदा होईल आणि मुस्लिम मतांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण होईल असे ओवेसी यांचे साधे गणित आहे.  हिंदू-मुस्लिम असा रंग निवडणुकीला चढला आहे. पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना, पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, राममंदिर हे मुद्दे प्रचारात आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्याने हौसले बुलंद झालेले ओवेसी धडाकेबाज प्रचार करीत आहेत.भाजपची सत्ता आली तर जुन्या हैदराबादवर (मुस्लिम बहुल भाग) सर्जिकल स्ट्राईक करून रोहिंग्यांना हाकलून लावू असा आक्रमक प्रचार भाजपचे काही नेते करीत आहेत.

भाजपच्या हितासाठी मते खाणारी (व्होट कटवे) पार्टी म्हणून एमआयएमवर बिहारमध्ये टीका झाली होती. आता तोच पक्ष हैदराबादमध्ये भाजपशी दोन हात करीत आहे. दुसरीकडे भाजपची सत्ता महापालिकेत आली तर शहराचे नाव बदलून भाग्यनगर केले जाईल, असे भाजप प्रचारात सांगत आहे. ही निवडणूक हैदराबाद विरुद्ध भाग्यनगरवाल्यांची असल्याचे सांगत ओवेसी हेही प्रचाराला धार्मिक रंग चढवत आहेत.‘ओवेसीसाठी एक मत म्हणजे मोहम्मद अली जिनांसाठी एक मत’ असा प्रचार भाजपचे तेजतर्रार खासदार तेजस्वी सूर्या करतात. ते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लादेनची औलाद अशी टीका एमआयएमवर केली जात आहे. ६६ वर्षांचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आपल्या पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन किल्ला लढवत आहेत. एमआयएम १५० पैकी ५१ जागा लढवत आहे.

हैदराबाद महापालिका ही चार जिल्ह्यांमध्ये विभागली गेलेली आहे. तेथे विधानसभेच्या २४ जागा आहेत आणि त्यापैकी सात ठिकाणी एमआयएमचे आमदार आहेत. लोकसभेच्या पाच जागा असून त्यापैकी एका जागेवर ओवेसी हे चवथ्यांदा खासदार आहेत. असे असले तरी एमआयएमचा गड मानल्या गेलेल्या हैदराबादेत केवळ ३३ टक्केच जागा एमआयएम लढत आहे. भाजप यावेळी मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालानंतर टीआरएस आणि एमआयएम यांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.टीआरएस आणि एमआयएमची सत्ता येण्याची वेळ आली तर महापौरपद आपल्यालाच मिळावे अशी अट एमआयएम टाकण्याची शक्यता आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली जावू शकते. २०१६ च्या महापालिका निवडणुकीत टीआरएसला १५० पैकी तब्बल ९९ जागांवर विजय मिळाला होता आणि त्यांची एकहाती सत्ता आली होती. एमआयएमने ४४ जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला फक्त  दोन ठिकाणी विजय मिळाला होता. यावेळी टीआरएसला ३७ टक्के, भाजपला ३० टक्के, एमआयएमला १७ टक्के तर काँग्रेसला ११ टक्के मते मिळतील असा निवडणूकपूर्व सर्वेक्षणांचा अंदाज आहे. तसे झाले तर भाजप सत्तेपासून दूर राहील. कारण, एमआयएम आणि टीआरएस एकत्र येतील पण भाजपने ६० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर सत्तेचे समीकरण भाजप जुळविल्याशिवाय राहणार नाही अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER