हे भांडत का नाहीत?

badgeमहाविकासआघाडी सरकारला दोन महिने उलटले आहेत. भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही असेच सारे बोलत होते. ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खायची’ अशा भावनेने तिन्ही पक्ष महाआघाडीच्या प्रयोगाकडे पाहत होते. देवेंद्र फडणवीस यांनी तर सहा महिन्याची डेडलाईन दिली होती. मंत्र्यांचे नाराजीनाट्य, मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेला विलंब उद्धव यांच्या छातीचे ठोके वाढवून गेला असणार. दोन महिने झाले. सुरुवातीच्या अडथळ्यानंतर तीन चाकाचे हे सरकार वरकरणी तरी सुरळीत सुरु दिसते आहे.

नागरिकत्व कायदा, सावरकर ह्यासारखे वादग्रस्त विषय येऊनही सरकार टिकून आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत तर विरोधकांना दररोज दारुगोळा देत आहेत. ‘डॉन करीम लालाला इंदिरा गांधी भेटायच्या’ असे संजय राऊत यांनी सांगूनही काँग्रेसवाले बिथरले नाहीत. ‘अजितदादा हे स्टेपनी आहेत’ असे सांगूनही दादांनी तिसरा डोळा उघडला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लाजवणारी एकी महाविकासआघाडीमध्ये दिसत आहे. हे भांडत का नाहीत? ह्या विचाराने भाजप नेत्यांना वेड लागायची पाळी आली असणार.

उद्धव ठाकरे यांना ओळखण्यात लोकांनी मार खाल्ला का? ह्या मुख्यमंत्र्याला कसलेही टेन्शन आल्याचे जाणवत नाही. कुठलाही वाद ते सहजपणे घेतात. राष्ट्रवादीवाले मलईदार खाती पळवताहेत हे लक्षात येऊनही उद्धव आड आले नाहीत. त्यामुळे सरकार डुगूडुगू सुरु आहे. हे सामंजस्य, हा समन्वय असाच चालू राहिला तर सरकार पाच वर्षे आरामात काढेल. आघाडीतल्या तरुण पिढीने तर त्या पुढची तयारी चालवली आहे.

दोन वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. तिन्ही पक्ष आघाडी करून ती लढतील? २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी असेल का? अवघड वाटते. आघाडी सरकार निवडणूक निकालानंतर सत्तेत आले. जागावाटपाची भानगड असती तर तीन पक्ष टिकले असते? महाआघाडी निकालानंतरच शक्य आहे. आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवतो म्हटले तर प्रत्येकाच्या वाट्याला ९०-९०-९० जागा येतील. ९० जागांमध्ये काय खेळणार? पण महापालिका निवडणुकीतही महाआघाडी एकत्र लढू शकते असे संकेत छोटे युवराज आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी आज एका कार्यक्रमात दिले आहेत. भाजप नेत्यांनी चिंतन करावे असे राजकारण सुरु आहे.

मोरेश्वर बडगे
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.