राज का जाताहेत अयोध्येला ; मनसेला राम वाचविणार?

Ayodhya - Raj Thackeray

मुंबई : मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या मार्चमध्ये अयोध्येला (Ayodhya) जाणार आहेत. युद्धभूमीवर गोंधळलेल्या अर्जूनाला श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले होते. राजकीय भूमिकेबाबत बरेचदा गोंधळणारे राज ठाकरे यांना रामदर्शनाने काही मार्गदर्शन मिळेल  का हा प्रश्न आहे.

राज ठाकरे यांनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांमुळे राजकीय मुद्यांवर यू-टर्न घेणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. एकदा त्यांनी गुजरातमध्ये जावून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रशंसा केली पण नंतर ते मोदींचे कट्टर विरोधक बनले आणि जाहीर सभांमधून त्यांनी तोफ डागली. एकदा त्यांनी त्यांच्या राज्यभरातील चाहत्यांना मुंबईत बोलावले. ‘या! मला काही सांगायचं आहे’, अशी साद त्यांनी घातली. हजारो समर्थक मुंबईत जमले. राज यांनी घोषणा केली की ते विधानसभेची निवडणूक स्वत: लढवतील. ही गोष्ट २०१४ पूर्वीच्या निवडणुकीची होती. निवडणूक लढवायला निघालेले पहिले ठाकरे म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला पण, राज यांनी भूमिका बदलली आणि निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून लढले, जिंकले आणि निवडणूक लढून जिंकणारे ते पहिले ठाकरे ठरले होते.

राज ठाकरे हाती घेतलेले विषय तडीस नेत नाहीत असा आरोपही त्यांच्यावर काही विषयांबाबत झाला. धरसोड भूमिका घेणारा नेता अशी टीका होत असली तरी त्यांच्याबद्दलचे आकर्षण आजही कायम आहे. राज काय बोलतात याकडे माध्यमांच्या, अन्य राजकीय पक्षांच्या आणि अर्थातच त्यांच्या समर्थकांच्या नजरा लागून असतात. लॉकडाऊनच्या काळात समस्याग्रस्त असलेल्या समाजातील अनेक घटकांचे लोक मातोश्रीपेक्षा कृष्णकुंजवर जावून त्यांची कैफियत मांडत असल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.गेली काही महिने राजकीय आघाडीवर राज शांत आहेत.

मुंबई महापािलकेची निवडणूक एक वर्षावर आली आहे. गेल्या निवडणुकीत राज यांच्या मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते आणि त्यातील सहा पुढे शिवसेनेत गेले. मुंबईत चांगले यश मिळावे यासाठी राज पूर्ण ताकद यावेळी पणाला लावतील असे दिसते. मध्यंतरी ते राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रभावाखाली गेल्याचे दिसत होते. त्यातून ते बाहेर पडतील का? हा प्रश्न आहे. राज भाजपसोबत जातील का या बाबत खूपच उत्सुकता आहे. शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये विभागणी करण्यासाठी राज यांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. ‘लावा रे तो व्हिडिओ’ म्हणत नरेंद्र मोदी, अमित शहा (Amit Shah), देवेंद्र फडणवीसांपासून (Devendra Fadnavis) भाजपच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका करणारे राज ठाकरे भाजपसोबत (BJP) गेले तर पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या यू-टर्न घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होईल.

भाजप (BJP) , शिवसेनेने (Shiv Sena) हिंदुत्ववादी मतदारांची स्पेस महाराष्ट्रात व्यापलेली आहे. अयोध्येला जाण्याची घोषणा करून राज कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेणार आहेत अशी चर्चादेखील सुरू झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करीत शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिकेची कास सोडली अशी टीका मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या गोंधळलेल्या हिंदुत्ववादी मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्न राज ठाकरे अयोध्या दौºयाच्या निमित्ताने करीत आहेत असे दिसते.

मुंबईतील परप्रांतियांना मनसेने नेहमीच टार्गेट केले. आता भाजपला मनसेसोबत युती करायची असेल तर मोठ्या प्रमाणात असलेली परप्रांतिय मते भाजपपासून दुरावू शकतात. राज यांची कमी होत असलेली ताकद सोबत घ्यायची की परप्रांतियांची एकगठ्ठा मते टिकवायची यापैकी एक पर्याय भाजपला निवडावा लागेल. परप्रांतियांबाबतची भूमिका राज ठाकरे बदलत नाहीत तोवर त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मनसेला सोबत घेतले तर भाजपची अडचण होऊ शकते.

राज यांना अयोध्येच्या दौºयाने फारकाही राजकीय फायदा होईल असे वाटत नाही. अयोध्येचा दौरा करायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे पण सध्या राम भरोसे असलेल्या पक्षाची घडी त्यांनी नीट बसवावी अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER