नैतिकतेच्या आधारावर आर.आर पाटलांचा राजीनामा घेणारे पवार देशमुखांना का पाठीशी घालतायेत?

Maharashtra Today

मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवास्थानी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. गाडी मालक मनसुख हिरेन यांचा तपास पोलिसांनी लावला. काही दिवसातच हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हे प्रकरण वेगवेगळी वळणं घेत आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना (Sachin Vaze) निलंबित करण्यात आलं तर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनं राजकीय वर्तूळात मोठा धमाका केला.

मुंबई पोलिस आयुक्त विरुद्ध गृहमंत्री

“दरमहिन्याला १०० कोटींची खंडणी वसूली करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी मला दिले होते.” अशा आशयाच पत्र मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहलेलं पत्र समोर आलंय. या प्रकरणात आता गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) जोडण्यात आलं असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरतीये.

तर दुसऱ्या बाजूला परमबीर यांनी केलल्या दाव्याबद्दल देशमुखांच्या समर्थनामध्ये तर्क मांडले जातायेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावले. मात्र, ज्या दिवशी वाझेंना भेटायला बोलावल्याचा दावा त्यांनी केला आहे, त्याच काळात गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते उपचार घेत होते. त्यावेळी त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या वैद्यकीय अहवालातून दिसून येते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्याबाबत या कागदपत्रांवरील माहिती खरी की खोटी, हा ही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिरेन प्रकरण गाजलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्र्यांकडे वाझेंच्या निलंबणाची मागणी केली होती. आता देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करतोय. राज्यातली भाजप देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाल्याचं दिसताना शरद पवारांनी मात्र दोन पत्रकार परिषदा घेत देशमुखांची पाठराखण केली. यामुळं दिवगंत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना एका विधानासाठी राजीनामा द्यायला लावणारे शरद पवार (Sharad Pawar) देशमुखांना पाठीशी का घालतायेत असा सवाल राजकीय वर्तूळात जोर धरतोय.

“बडे बडे शहरों में…”

२६ नोव्हेंबर २००८ ला आतंकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यावेळी कॉंग्रेस- राष्ट्रवादीचं राज्यात सरकार होतं. कॉंग्रेसचे दिवगंत नेते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर आर. आर. पाटील (RR Patil) गृहमंत्री होते. २६ नोव्हेंबला रात्री हल्ल्या सुरुवात झाली. पाकिस्तानचे दहशतवादी मुंबईत घुसुन बेछूट गोळीबार करत होते. निष्पापांनी या हल्ल्यात जीव गमावला होता.

आर. आर. पाटीलांकडे गृहखात असल्यामुळं पत्रकारांनी त्यांना हल्ल्याबद्दल विचारलं असता, “बडे बडे शहरों में एसी छोटी मोटी बाते होती रेहती है!” असा फिल्मी डायलॉग आबांनी मारला आणि परिणास्वरुप पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शरद पवारांनी आर. आर. पाटलांना नैतिक जबाबदारी घ्यायला लावून राजीनामा द्यायला लावला होता. तेच शरद पवार आता अनिल देशमुखांची पाठराखण का करताना दिसायेत.

न्याय समान का नाही?

एका प्रतिष्ठीत नागरिकाच्या घराबाहेर स्फोटक ठेवली जातात. स्फोटक ठेवणारा व्यक्ती पोलिस असल्याच समोर येतं. मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत. तपास केंद्र सरकारकडं जातो. सचिन वझे आरोप मान्य करतात. तर मुंबईचे आयुक्त गृहमंत्र्यांवर आरोप करतात. गुन्हेगारांनी करायची कामं पोलिस करत आहेत. चित्र सगळं स्पष्ट आहे तरी देशमुख राजीनामा का देत नाहीत? असा प्रश्न राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रकार परिषदेत उपस्थीत केला.

राज्यात गोंधळाची परिस्थीतीत असताना शरद पवारांनी दिल्लीकडं मोर्चा वळवला. दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेत देशमुखांची पाठराखण केली. संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक झाली. आज सकाळी पवारांनी दुसरी पत्रकार परिषद घेत देशमुखांना क्लिनचीट देत राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्ट केलं.

आदर्श घोटाळा प्रकरणात माजी मंत्री काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप झाले. यानंतर अशोकराव चव्हाणांनी देखली राजीनामा दिला होता. पुजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणात कॉल रेकॉर्डिंगमध्ये राठोड यांचा आवाज असल्यामुळं राठोडांच्या राजीनाम्याची मागणी वाढली. या प्रकरणात ही शरद पवार राठोडांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या. राठोडांनी राजीनामा दिला. पण याआधी पवारांनी धनंजय मुंडेंवर लैंगिक छळाचा आरोप झाले असतानाही त्यांना राजीनामा द्यायला लावला नव्हता.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सेफ साईड राजकारण खेळतीये का?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि देशमुखांची केलेली पाठराखण, एमपीएससीच्या परिक्षा पुढं ढकलली जाऊ नये, अशी रोहित पवारांची भूमिका, राठोडांवर नाराजी यामुळं शरद पवार शिवसेनेला टीकेचं धनी करुन सेफ साईड राजकारण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगलीये. महाविकास आघाडी सरकारवर आणि तिन्ही पक्षातल्या सामंजस्यावर याचा काय परिणाम होईल याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER