जे सुंदरी करिता अवलंबिले ते अवनी करिता का नाही?

यवतमाळ जिल्ह्यात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाने गोळ्या घालून ठार केल्याच्या प्रकरणावरून सध्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे टीकेचा विषय ठरले आहेत.काही व्याघ्र प्रेमी, एनजीओ तसेच जंगलांच्या संवर्धनासाठी कार्य करणारे कार्यकर्ते यांनी सुधीरभाऊ यांच्यावर टीका केली असती तर ते एक परी समजून घेता आले असते पण भाजपाच्या नेत्या असलेल्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी एक खरमरीत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात मागणी केल्याने सुधीरभाऊंची अडचण झाली आहे.

कोट्यवधी झाडे लावून विक्रम करणारे सुधीर भाऊ खरे तर वनमंत्री म्हणून वेगळा ठसा उमटवत होते. गेल्या चार वर्षात त्यांनी वनसंवर्धनासाठी बऱ्याच उपाययोजना देखील केल्या. जगाचे आकर्षण असलेले ताडोबाचे जंगल हे सुधीरभाऊ पालकमंत्री असलेल्या चंद्रपुर जिल्ह्यातच आहे. वित्त मंत्री असलेले सुधीर भाऊ आणि वित्त राज्यमंत्री असलेले शिवसेनेचे दीपक केसरकर या जोडगोळीने एक वेगळाच ध्यास घेतला आहे. चंद्रपूर आणि केसरकरांचा सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे खरे तर राज्याच्या दोन टोकांवर आहेत पण त्यांच्यामध्ये बरीच समानतादेखील आहे समानतेचे अनेक मुद्दे या दोघांनी तासन्तास बसून काढले आणि चांदा व बांदा यांच्या विकासाची महत्त्वाकांक्षी योजना तयार केली आणि आज तिला मूर्त स्वरूप मिळत आहे. पर्यटन जंगल या दोन समान गोष्टींनी चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन टोकावरच्या जिल्ह्यांना आज एका धाग्यात विणण्याचे काम मुनगंटीवार आणि केसरकर करत आहेत .दोघांच्या कल्पकतेतून दोन मागासलेल्या जिल्ह्यांना न्याय मिळण्याचा प्रयत्न होत आहे.

असे सगळे व्यवस्थित सुरू असताना आणि विकास खारगे यांच्यासारखा सक्षम सचिव वनविभागाला मिळालेला असताना सुधीरभाऊंच्या चार वर्षातील कामगिरीवर एका वाघिणीच्या मृत्युने पाणी फेरले जाते की काय असे चित्र निर्माण झाले आहे .अवनी ही नरभक्षक होती. तिने तेरा-चौदा लोकांचा बळी घेतला त्यामुळे तिला ठार मारणे आवश्यक होते असा पवित्रा मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
मात्र विविध राजकीय पक्षांचे नेते, जंगल व प्राणी प्रेमी त्यांच्या संघटना यांनी, अवनीला ठार करण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती, तिला बेशुद्ध करून ताब्यात घेता आले असते आणि नंतर तिचे पुनर्वसन एखाद्या प्राणिसंग्रहालयात करता आले असते अशी भूमिका मांडली आहे. ओरिसामधील सत्कोशिया व्याघ्र प्रकल्पात सुंदरी नावाची वाघीण अशीच नरभक्षक बनली होती. दोन आठवडे तिने अक्षरशः धुमाकूळ घातला, काही जणांना ठार केले अनेकांना जखमी केले. तेथील वनविभागाने तिच्या मागावर राहून तिला गाठले आणि आणि विशिष्ट प्रक्रियेचा वापर करून तिला बेशुद्ध केले नंतर तिच्यावर नीट उपचार केले व तिचे पुनर्वसन देखील केले ही सगळी प्रक्रिया अवनीच्या बाबतीत अवलंबिता आली असती. मात्र तसे करण्यात महाराष्ट्राच्या वनविभागाला अपयश आले.वाढते नागरीकरण, मानवी वस्त्यांचा होत असलेला विकास, दुसरीकडे जंगले आणि जंगलांमधील पशुपक्ष्यांचे अस्तित्व यातून निर्माण होणारा संघर्ष यापुढील काळात अधिक तीव्र होत जाणार आहे. “हर शेर का अपना एक जंगल होता है” अशी एक म्हण आहे .एक वाघ दुसऱ्या भागाच्या क्षेत्रात जात असेल तर तसे करण्याआधी तो त्याची परवानगी घेतो असे म्हणतात. जंगलांमधील पशूंचे आणि त्यातही जंगलचा राजा असलेल्या वाघाचे स्वतंत्र अस्तित्व हे टिकलेच पाहिजे. खरं तर अवनी नरभक्षक बनल्यामुळे तिला ठार मारणे आवश्यक होते हे सांगताना आणि मनेका गांधी यांच्यावर टीका करताना सुधीरभाऊंनी वापरलेली भाषा पण उद्धटपणा कडे झुकणारी होती त्यांचे म्हणणे त्यांना सौम्य शब्दात मांडता आले असते.मनेका गांधी या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांचा मुलगा वरूण आणि त्या स्वतः असे दोघेही लोकसभेचे खासदार आहेत.मनेका यांची भारतीय राजकारणामध्ये एक वेगळी ओळख आहे.

त्यांचे निस्सीम प्राणी प्रेम हा टीकेचा आणि प्रशंसेचादेखील विषय राहिला आहे. टीकेची चिंता न करता त्या प्राणी प्रेमाची जोरदार पाठराखण करीत आल्या आहेत.अशावेळी त्यांच्या भावना समजून घेत सुधीरभाऊंनी प्रतिक्रिया दिली असती तर ते सुसंस्कृतपणाचे लक्षण ठरले असते.त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याकडून अशी पोरकट भाषा अपेक्षित नव्हती. त्यातच सुधीरभाऊ संघ परिवारातून आलेले आहेत.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि त्यांचे वडील यांचे अत्यंत स्नेहपूर्ण संबंध राहिले आहेत.या सगळ्या गोष्टींची बूज मनेका गांधी यांच्यावर टीका करताना राखता यायला हवी होती. मनेका गांधी यांची दिल्लीत जाऊन सुधीर भाऊंनी खास भेट घ्यायला हवी होती अन आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडायला हवे होते.अजूनही वेळ गेलेली नाही.सुधीरभाऊंनी ते करावे.

सुधीरभाऊंच्या टीकेने मनेका गांधी दबणार नाहीत. इंदिराजी या देशातील सर्वात शक्तिशाली राजकारणी होत्या आणि त्याकाळी भल्याभल्या लोकांची त्यांच्या समोर आणि त्यांच्या मागेही त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती. त्या काळात इंदिराजींना खडे बोल सुनावणारी हीच करारी सून होती हे सुधीरभाऊंनी लक्षात घेतले पाहिजे.गांधी यांना राजकारणात आणखी काही मोठे मिळवण्यासारखे राहिलेले नाही. मात्र सुधीरभाऊंच्या पुढ्यात एक मोठी राजकीय कारकीर्द वाढून ठेवलेली आहे. आपल्याच पक्षाच्या महिला केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध सुधीरभाऊ ज्या पद्धतीने बोलत सुटले आहेत ते बघता त्यांचे दिल्लीतील गुण वाढण्याची शक्यता नाही. उलट ते कमी होण्याची शक्यता अधिक आहे हा धोका त्यांनी लक्षात घेतला पाहिजे.