प्रकाश आंबेडकरांचं कुणाशी का पटत नाही?

badgeवंचित बहुजन आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच बिघाडीची चिन्हे दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे. आघाडीचे ६५ वर्षे वयाचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर हे मित्रपक्ष एमआयएमला फक्त ८ जागा द्यायला तयार असल्याच्या बातम्या आहेत. ह्या बातम्यांमध्ये दम असेल तर वंचित आघाडी फुटेल. एवढ्या कमी जागांमध्ये कुणी कसा तयार होईल? एमआयएमचे नेते औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील खुलून बोलायला तयार नाहीत. मात्र ते आशावादी वाटले.

निवडणुकीला अजून दीड महिना आहे. कुठलाही राजकीय पक्ष इतक्या लवकर आपले पत्ते खुले करत नाही. युतीचे जागावाटप कसे होते त्यावर विरोधकांचा सारा खेळ आहे. युतीचे सारी ऑपरेशन्स सुरळीत पार पडली तर काँग्रेस आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी ह्या दोन्ही आघाडींची गोची आहे. युतीमध्ये जागा आणि तिकीटवाटप जाहीर झाल्यावर बंडखोरी माजेल असा विरोधकांचा अंदाज आहे. शरद पवारांचा तर बंडखोरांवर मोठा डोळा आहे. पण गणपती उठल्यानंतरच राजकीय हालचालींना वेग येईल. तोपर्यंत उलटसुलट बातम्या येत राहतील.

युतीचे समजू शकते. सत्तेतले पक्ष असल्याने तिकडे तिकिटासाठी हाणामारी आहे. पण वंचित आघाडीचे तसे नाही. वंचित आघाडीकडून ह्यावेळी चमत्काराची अपेक्षा आहे. ऑगस्टअखेर वंचितची पहिली यादी येईल असे जाहीर झाले होते. पण तसे काही झाले नाही. उलट बिघाडीच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. असे का व्हावे? प्रकाश आंबेडकर यांचे कुणाशीच का पटू नये? काँग्रेस आघाडीपुढे त्यांनी अशा अटी ठेवल्या आहेत की कुणालाही मान्य होणार नाहीत. आता एमआयएमही त्यांच्या तडाख्यात सापडली दिसत आहे.

दलित मतं एमआयएमला जातात. पण मुस्लिम मतं बहुजन आघाडीला मिळत नाहीत असा समज प्रकाश आंबेडकर यांनीं करून घेतला आहे. आणि त्यात काही वास्तवही आहे. लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणात दलित मतं मिळाल्याने एमआयएमने खाते उघडले. पण अकोला आणि सोलापूर येथे आंबेडकरांना मुस्लिम मते पाहिजे तशी मिळाली नाहीत. मुस्लिम मतं मिळणारच नसतील तर आघाडीची मोट बांधून त्यांना भरमसाट जागा देण्यात अर्थ काय? असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. पण दोन काँग्रेसच्या आघाडीतही हेच घडते. राष्ट्रवादीची १०० टक्के मतं काँग्रेसला परिवर्तित होतातच असे नाही. आघाडीच्या राजकारणातले हे फायदेतोटे आहेत. पण म्हणून आंबेडकरांनी काही वेगळा निर्णय केला तर भाजपचे फावणार आहे. लोकसभा निवडणुकीत झाले तेच विधानसभेत होईल. मतविभागणी होईल. भाजपची बी टीम असल्याचा आंबेडकरांवर आरोप होतो. त्याला बळ मिळेल. प्रकाश आंबेडकरांचे कुणाशी का जमत नाही? असे लोक आता उघड बोलू लागले आहेत. काँग्रेसने नाद सोडला. असाच घोळ चालला तर ओवेसीही वेगळा विचार करतील. त्यामुळे यावेळी आंबेडकरांची कसोटी आहे. कुठे बसायचे?