बाबा घराबाहेर बसून का जेवतात? पोलिस बाप आणि लेकीचा हृदयस्पर्शी फोटो

नवी दिल्ली :- ‘कोरोना’ बदोबस्ताच्या ड्युटीवर लगेच जायचे असल्याने एक पोलीस जेवायला घराबाहेर बसला. बाबा गराबाहेर बसून का जेवत आहेत, हे त्याच्या लहान मुलीला कळत नव्हते. ती दरात उभी राहून, घराबाहेर बसून जेवणाऱ्या बाबाकडे कुतूहलाने पाहत होती. सोशल मीडियावर हा फोटो सध्या गाजतो आहे. हा फोटो इंदोरच्या तुकोगंज पोलिस ठाण्याचे टी.आय. निर्मल श्रीनिवास आणि त्यांच्या मुलीचा आहे.

कोरोनाच्या बदोबस्ताच्या काळात पोलिसांचा अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यांना बरेचवेळा सतत कामावर हजर रहावे लागते. या काळात जेवणासाठी घरी येणारे काही पोलीस, कुटुंबाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून घराबाहेर बसून जेवतात. कारण, कोरोना हा साठीच रोग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीद्वारे पसरत असतो.

पोलिसांना जेव्हा लगेच ड्युटीवर जायचे असते, कपडे बदलून स्नान करायला वेळ नसतो तेव्हा काही पोलीस, कुटुंबातील व्यक्तींचा संपर्क टाळण्यासाठी असे घराबाहेर बसून जेवतात आणि लगेच ड्युटीवर जातात. अनेक जणांनी हा फोटो शेअर करत पोलिस आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ नाही. आपण देशभक्तीचे काम करूया आणि घरातच बसूया, असं आवाहन केले आहे. पोलिस खात्यातल्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तसंच पोलिसांनी देखील हा फोटो शेअर केला आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या देशातील पोलिसांवर प्रचंड ताण आहे. अशाही परिस्थितीत पोलीस त्यांचे काम निष्ठेने करत आहेत. संकटाच्या काळात पोलिस आणि डॉक्टर, सफाई कामगार जनतेसाठी देवदूत ठरले आहेत.