मुलांच्या हातात करवंट्या द्यायच्या का? – राजा काजवे यांचा सेना नेतृत्वाला सवाल

रत्नागिरी/प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देणारे प्रकल्प हवे आहेत. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाला जिल्ह्यातील लोकांचा पाठिंबा आहे. असे असूनसुद्धा रोजगार देणाऱ्या रिफायनरीसारख्या प्रकल्पाला विरोध करून आमच्या मुलांच्या हातामध्ये भविष्यात करवंट्या देणार आहात का, असा सवाल शिवसेनेचे सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे यांनी शिवसेना नेतृत्वाला केला आहे. आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले शिवसैनिक असून बाहेरून पक्षात आलेल्या उपऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोलाही त्यांनी उदय सामंत यांना हाणला.

मुख्यमंत्र्यांकडून हिंगणघाट पीडितेच्या कुटुंबाला दिलेल्या वचनाची पूर्तता

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत भूमिकेवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या सागवेच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेना नेतृत्वाने कारवाईही केली आहे. सोमवारी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत याांनी रिफायनरी कंपनीच्या किंवा समर्थकांच्या आहारी जाऊन जे शिवसैनिक काम करीत असतील त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला. त्या पार्श्‍वभूमीवर काजवे यांनी आज रोखठोक भूमिका मांडली.

आम्ही प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी रत्नागिरी येथे येणारी फाइव्ह स्टार एमआयडीसी का व कशी गेली, याचा विचार करावा. आम्ही अद्यापही शिवसेना सोडलेली नाही. जनतेच्या विकासाच्या मागणीसाठी राजीनामे दिले आहेत. केवळ फायद्यासाठी शिवसेनेत आलेल्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. प्रदूषणाच्या नावाखाली प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांनी पर्यावरणपूरक किती प्रकल्प कोकणात आणले आणि लोकांना रोजगार दिला, असा सवाल काजवे यांनी केला.