‘डे-नाईट कसोटी सामने शक्यतो नकोच’ असे भारतीय खेळाडू का म्हणताहेत?

India team

भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या

(India vs England) तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अहमदाबाद (Ahmedabad) येथील खेळपट्टीवरून वादंग सुरू असतानाच आता डे-नाईट कसोटी (Day-night test) सामने खेळायलाही भारतीय क्रिकेटपटू फारसे उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी सामने खेळवावेत का, याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विचार चालवला असल्याची माहिती आहे.

खेळाडू दोन मुद्द्यांवर डे-नाईट कसोटी सामन्यांबाबत नाराज आहेत. पहिला चेंडू म्हणजे गुलाबी चेंडू (Pink Ball) पटकन दिसून येत नाही आणि दुसरा म्हणजे गुलाबी चेंडू हा नेहमीच्या लाल चेंडूपेक्षा अधिक जलद बॅटीवर येतो.  त्यामुळे फलंदाजांना खेळणे अवघड जाते. संघ व्यवस्थापनाने कळवलेला हा अभिप्राय बीसीसीआयने (BCCI) गंभीरतेने घेतला आहे. खेळाडूंचे मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात डे-नाईट कसोटी सामने घ्यायचे की नाही हा विषय आम्ही लवकरच चर्चेला घेऊ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अहमदाबाद कसोटीत जे ३० फलंदाज बाद झाले त्यापैकी २८ फिरकी गोलंदाजांनी बाद केले. यापैकी बहुसंख्य फलंदाज हे वेगाने आलेल्या सरळ चेंडूवर बाद झाल्याचे दिसून आले. गुलाबी चेंडूबाबत हीच खरी समस्या आहे. नेहमीच्या सरावाने खेळाडूंना वाटते की चेंडू एका ठरावीक गतीने येईल; पण गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा अधिक गतीने येतो. याशिवाय चेंडू पटकन दिसायलाही अवघड जाते.  त्यामुळे खेळाडू डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी फारसे उत्सुक नसल्याचे भारतीय संघव्यवस्थापनाने कळवले आहे.

या सामन्यात ६६ व नाबाद २५ धावांच्या खेळी करणारा रोहित शर्मा म्हणतो की, गुलाबी चेंडू लवकर बॅटीवर येतो हे खरेच! शिवाय संध्याकाळचे वातावरण ज्यात तापमान कमी होते आणि दवही पडते. त्याचाही परिणाम होतो; पण चेंडूच्या गतीशी लवकरात लवकर जुळवून घेणे सर्वांत  महत्त्वाचे ठरते. सामन्यात ११ बळी घेणाऱ्या अक्षर पटेलच्या मते गुलाबी चेंडूवर जो जादा थर असतो त्यामुळे चेंडूची गती वाढते. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर अधिक वेगाने निघतो म्हणून कदाचित एलबीडब्ल्यूने बाद होणे अधिक दिसले. आणखी एक खेळाडू म्हणाला की, अहमदाबादचा सामना गुलाबी चेंडूवर दोनच दिवसांत संपला; पण हाच सामना आधीच्या सामन्यांप्रमाणे दिवसा आणि लाल चेंडूवर खेळला गेला असता तर चौथ्या दिवसापर्यंत गेला असता.

सहसा डे-नाईट कसोटी सामन्यांसाठी संध्याकाळचे कमी तापमान, हवेतील ओलावा आणि दवाचा फायदा घेण्यासाठी जलद वा सीम गोलंदाजांना पसंती दिली जाते आणि त्यासाठीच खेळपट्टीवर गवतही राखले जाते जेणेकरून चेंडूचा रंग जास्त काळ टिकून राहील  व चेंडूही अधिक काळ टिकेल. याच समजातून इंग्लंडने एकच फिरकी गोलंदाज खेळवला; पण भारताने फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवल्याची चर्चा असून म्हणूनच भारताने डे-नाईट कसोटी असूनही तीन तीन फिरकी गोलंदाज खेळवले असे मानले जाते.

भारताने आतापर्यंत खेळलेल्या तीन डे-नाईट कसोटीपैकी एक गमावली तर दोन जिंकल्या आहेत आणि जी कसोटी गमावली त्यात ॲडिलेडला आपण अवघ्या ३६ धावांतच बाद झालो होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER