दाऊदच्या दोन बिल्डींग का तोडल्या नाहीत, त्याला घाबरता? – आठवलेंचा शिवसेनेला टोमणा

Uddhav Thackeray & Ramdas Athwale

मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम बेकायदा ठरवून, शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाने ते तातडीने पाडले. यावर टीका करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेनेला (Shivsena) प्रश्न विचारला – मुंबईत सुमारे ५४ हजार इमारती अनधिकृत आहेत. त्या इमारतींवर कारवाई का नाही? दाऊदच्या दोन इमारती पाडण्याचे आदेश आहेत, त्या का नाही पाडल्या? दाऊदला घाबरता?

कंगनाला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले – कंगना १६ वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो. ती महिला असून मुंबईची नागरिक आहे. मंत्री म्हणून तिला पाठिंबा देण्याची माझी जबाबदारी आहे.

आठवले म्हणाले, कंगना दोन गोष्टी चुकीच्या बोलली पण त्यासाठी तिला हरामखोर, नॉटी, तुझे थोबाड फोडू असे शिवसेनेचे म्हणाले. त्यामुळेच मुंबईची नागरिक म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी मी घेतली.

कारवाई सूडबुद्धीने

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करतो आहे. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या ज्येष्ठ नागरिकावर शिवसेनेने हल्ला केला; त्या हल्ल्याचे समर्थनही केले! त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी केली नाही. हल्लेखोर जामिनावर बाहेर आहेत. कंगना राणावतलाही अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूडबुद्धीने वागणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त केले पाहिजे. राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी मी केंद्रात प्रयत्न करणार आहे, ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER