मुंढे का गेले? त्यांना घालवले कोणी?

Tukaram Mundhe

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची तडकाफडकी बदली झाली. आदल्या दिवशी त्यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली अन् दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात बदलीचा कागद पडला. आंधळ्या व्यक्ती हत्तीला हात लावतात आणि तो कसा आहे त्याचं वर्णन करतात. तसेच विश्लेषण गेले दोन दिवस वेगवेगळे चॅनेल्स, वृत्तपत्रे मुंढे यांच्या बदलीच्या निमित्ताने करीत आहेत. मुंढे कोणामुळे गेले? एकाने लिहिले की मुंढेंना nगडकरींची (Nitin Gadkari) नाराजी भोवली, दुसऱ्याने लिहिले काँग्रेसच्या (Congress) विरोधामुळे मुंढेंची बदली, तिसऱ्याने लिहिले देवेंद्र फडणवीसांमुळे मुंढे बदलून गेले. मी सांगतो की, मुंढे कोणामुळे गेले? मुंढे यांना कोणीही घालवले नाही, ते केवळ आणि केवळ स्वत:मुळे गेले. मुंढेंना मुंढेंनी घालवले. या निमित्ताने बोध घेऊन मुंढेंनी स्वत:ची कार्यशैली बदलली तर त्यांचे चांगले होईल आणि त्यांच्या निमित्ताने एक चांगला अधिकारी नेहमीसाठी लोकांना मिळत राहील.

लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचे आणि लोकप्रतिनिधी सभागृहाचे स्थान सर्वांत वरचे आहे आणि नोकरशाही ही त्यांच्या नियंत्रणाखालीच काम करीत असते. काही अधिकाऱ्यांना या मूळ तत्त्वाचे भान सुटते आणि त्यांचा मुंढे होतो. मुंढे अतिशय प्रामाणिक आहेत, स्वच्छ आहेत, तडफदार आहेत; पण या सगळ्या गुणांचा समुच्चय असतानाही ते कमालीचे उद्धट, एककल्ली आहेत. या एककल्लीपणानेच गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांच्यावर १४ बदल्यांची पाळी आणली आहे. मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची समाजाला गरज आहे; पण त्यांच्यातील एककल्लीपणा वगळून ते वागले तर अमीट ठसा उमटवू शकतात. त्यांच्यासारख्या एका अधिकाऱ्यावर वारंवार बदली व्हावी याचे कोणत्याही संवेदनशील माणसाला दु:खच होईल; पण त्याहीपेक्षा त्यांच्यातील अवगुणाने त्यांच्यावर ही पाळी आणावी याचे दु:ख अधिक आहे.

मुंढे यांची प्रत्यक्षाहून प्रतिमा वेगळी आहे, असे नाइलाजाने म्हणावे लागते. जगातील सर्व बुद्धिमत्ता आपल्याच ठायी एकवटलेली आहे आणि इतर सगळे क:पदार्थ आहेत ही वृत्ती तुम्हाला एका विशिष्ट दंभाकडे घेऊन जाते आणि तेथे तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दिसत नाही. मुंढे यांचे दुर्दैवाने तसे झाले आहे.

मुंढे यांनी तत्त्वांशी तडजोड करावी असे आमचे म्हणणे नाही. तसे त्यांनी आयुष्याच्या कोणत्याही वळणावर करू नये. कारण तत्त्वनिष्ठा हीच त्यांची मिळकत आणि तेच त्यांचे सौंदर्यस्थळ आहे आणि तेच त्यांचे शस्त्रही. तत्त्वहीन मुंढे म्हणजे नि:शस्त्र योद्धा.

आपल्या वागणुकीने प्रत्येकाला दुखावण्याचे त्यांनी थांबविले पाहिजे. ते एकटेच प्रामाणिक नाहीत. आजवर या राज्याने असंख्य प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ आयएएस अधिकारी अनुभवले आहेत. दुसऱ्याच्या पैशाने चहादेखील न पिणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी परंपरा या राज्याला आहे. सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका घेत प्रामाणिकपणाची कास कुठेही न सोडणारे अधिकारी म्हणून मुंढे यांनी स्वत:ला बदलवून घेतले तर त्यांच्यावर वारंवार बदलीची पाळी येणार नाही. भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी सर्वगुणसंपन्न आहेत असे मानण्याचे कारण नाही. त्यांच्यात अनेक उणिवा आहेत. त्यावर बोट ठेवून मुंढेंनी कारवाईचा बडगा उचलला असता आणि त्याच वेळी संयमाने वागण्याची भूमिका घेतली असती तर ते अधिक काळ टिकले असते. केवळ भाजपच्याच नाही तर काँग्रेसच्याही नेत्यांशी त्यांचे टोकाचे वाद झाले. सगळ्याच राजकीय पक्षांना ते नकोसे झाले होते. त्यामुळे सगळ्यांनीच मुंबईतील नेत्यांकडे नाराजी कळविली होती. मुंढे यांच्यातील तडफदार, आक्रमक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचे आम्हीही प्रशंसक आहोत. असा एक अधिकारी स्वत:च्या वागण्याने वाया जाऊ नये हीच आमची कळकळ आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER