साहेबांनी मुंडेंना का वाचविले ?

Shailendra Paranjapeपेशवाईच्या काळात नारायणराव पेशवा यांच्यावर पुण्याच्या शनिवारवाड्यात ्नगारद्यांकडून जीवघेणा हल्ला झाला तेव्हा जिवाच्या आकांताने नारायणवाव ओरडले, ‘काका, काका मला वाचवा’ पण काका रघुनाथराव पेशवे (Raghunathrao Peshwa) यांनी नारायणरावांचा बचाव केला नाही आणि ते मारले गेले. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांना काका म्हटले जाते ते अजित पवार (Ajit Pawar) यांचे काका आहेत म्हणून. अजित पवार यांचे अभिन्न मित्र आणि पहाटेच्या बंडातील त्यांचे सहकारी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर दोन दिवसांपूर्वी चारित्र्याच्या मुद्यावरून एक हल्ला झाला. परस्पर सहमतीने ते ज्या महिलेबरोबर अनेक वर्षे राहिले, जिला त्यांच्यापासून दोन मुले झाली त्या महिलेच्या बहिणीने धनंजय यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि राज्यभरात खळबळ उडाली. ‘धनंजय यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, त्यांच्याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ’ असे शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. तेव्हा सगळीकडे ही चर्चा सुरू झाली की पवार म्हणताहेत की मामला गंभीर आहे म्हणजे धनंजय यांना राजीनामा द्यावा लागणार. पण पवार जे बोलतात त्याच्या अगदी उलटे करतात असा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. इथे तर त्यांनी फक्त संकेतच दिले होते. त्यामुळे त्याच्या अगदी उलट घडणार हे पवारांना ओळखणारे लोक छातीठोकपणे सांगत होते आणि शुक्रवारी घडलेदेखील तसेच.

धनंजय यांच्यावरील आरोप गंभीर आहेत असे गुरुवारी सांगणारे पवार शुक्रवारी मात्र म्हणाले की, आरोप करणाºया व्यक्तीच्या संदर्भात आणखी तक्रारी समोर आल्यानंतर त्यांची चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्याने मुंडेंविरुद्धच्या तक्रारीची चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करावा.अधिक खोलात जावून वास्तव समोर आणण्याची गरज आहे, असे सांगत पवार यांनी मुंडे यांचा तूर्ततरी बचाव केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार नाही वा राजीनामा घेतला जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

मुंडे यांचा बचाव का केला गेला या बाबत वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. एकतर ते वंजारी समाजाचे आहेत आणि त्यांचा राजीनामा घेतल्यास हा मोठा समाज दुखावला जाईल, म्हणून त्यांना धक्का लावला गेला नाही, असे म्हटले जाते. मुंडे हे अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना धक्का लावण्याची पक्षाची हिंमत झाली नाही असेही म्हटले जाते. धनंजय यांचा राजीनामा घेतला असता तर राजकारणातील त्यांचे महत्त्व कमी झाले असते आणि त्यांच्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या भगिनी व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना स्वत:चे प्राबल्य वाढविण्याची आयती संधी मिळाली असती, हे लक्षात घेऊनही धनंजय यांना अभय देण्यात आले असे मानले जाते.काल दुपारनंतर त्या तरुणीविरुद्ध तक्रार करणाºया काही व्यक्ती समोर आल्यानंतर आता धनंजय यांच्या बचावासाठी मोर्चेबांधणी जोरदार सुरू झाली असल्याचे तसेही स्पष्ट दिसत होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केलेले आहेत पण अद्याप त्यांना प्रदेश अध्यक्षपदावरून हटविण्यात आलेले नाही, त्यांनाही अभय देण्यात आले आहे.

राष्ट्रवादीच्या या अभय योजनेचा आरोपित नेत्यांना फायदा होत आहे.

भाजपच्या महिला आघाडीने मात्र मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER