का घातले संजय राऊतांनी काँग्रेसला साष्टांग दंडवत

Sanjay Raut - Congress

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या लेखातून काँग्रेसला (Congress) साष्टांग दंडवत घातले आहे. असे काय झाले की राऊत यांच्यावर ही वेळ आली. निमित्त आहे, औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhaji Nagar) असे नामांतर करण्याचे. राऊत यांनी रविवारच्या सामनाच्या अंकात रोखठोक लिहिले आहे. त्यांच्या या सदराची नेहमीच चर्चा असते. यावेळी त्यांनी औरंगजेब हा कसा धर्मांध होता, हिंदुद्वेष्टा होता, त्याने कशी हिंदुंची मंदिरे पाडली व त्या ठिकाणी मशिदी बांधल्या, हिंदुंना मोठ्या पदांवर बसू द्यायचे नाही असे त्याचे आदेश होते वगैरे नमूद केले आहे.एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना औरंगजेबाने कसे निर्दयीपणे ठार मारले, हाल हाल करुन मारले याचे वर्णन केले आहे. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती आहे म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा नाहीतर इतिहासाचे भान म्हणा, असे राऊत यांनी या लेखात म्हटले आहे.

राऊत यांचा लेख वाचल्यानंतर राजकीय निरिक्षकांना एक प्रश्न पडला आहे. तो असा की, १९९५ ते १९९९ पर्यंत शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. तेव्हाही औरंगजेबाचा राऊत सांगतात तोच इतिहास होता. कारण हा शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. औरंगजेबाची निर्दयता युती शासनाच्या काळातही तशीच होती ना? मग त्याच्या औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात शहर असू नये यासाठी तेव्हाच शिवसेनेने नामांतर का केले नाही? युती शासनाच्या काळापर्यंत मुंबईचे अधिकृत सरकारी नाव बॉम्बे असे होते आणि ते बदलण्यासाठी शिवसेना प्रचंड आग्रही होती. बॉम्बे या नावाला शिवसेनेचा विरोध का होता? तर त्यांचे असे म्हणणे होते की बॉम्बे हे नाव ब्रिटिश साम्राज्यवादाची म्हणजे गुलामगिरीची आठवण करून देणारे आहे. मुंबादेवी हे मुंबईचे आराध्यदैवत आहे आणि त्यावरून मुंबई हेच नाव अधिकृत असले पाहिजे. बॉम्बेचे मुंबई असे नाव करण्यात शिवसेना यशस्वी झाली मग औरंगाबादचे संभाजीनगर का नाही करुन घेतले?

औरंगजेब हा धर्मांध, हिंदुद्वेष्टा होता, तो आक्रमक होता, त्याने संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली, असे असले तरी औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे’ या शब्दात राऊत यांनी काँग्रेसला या लेखात टोला हाणला आहे. एकंदरीत या लेखाद्वारे औरंगजेबाच्या नावाला काँग्रेसचा विरोध म्हणजे तमाम हिंदुंचा विरोध असा रंग या लेखाच्या माध्यमातून देत राऊत यांनी चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे. काँग्रेस या लेखावर काय प्रतिक्रिया देते ते पहायचे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केल्याने मुसलमान नाराज होतील व आपल्या व्होटबँकेवर परिणाम होते असे ‘सेक्युलर’ काँग्रेसला वाटत असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आधीच स्पष्ट केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे हे आमचेही दैवत आहेत पण औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हा विषय महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) किमान समान कार्यक्रमात नाही. हिंदुत्व, औरंगजेब, औरंगाबाद असे मुद्दे उपस्थित करून राऊत हे शिवसेनेला राजकीय फायदा मिळवून देऊ पाहत आहेत पण त्याचवेळी ते सरकारमध्ये सोबत असलेल्या काँग्रेस या मित्रपक्षाची गोची करण्याचाही प्रयत्न करीत आहेत. आपल्या पक्षाची प्रतिमा मोठी करण्यासाठी मित्रपक्षाला अडचणीत आणण्याचा राऊत यांचा हा ‘आघाडी-अधर्म’ न समजण्यासारखा आहे. भाजपने तर औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यास पाठिंबाच दिला आहे. विरोध आहे तो काँग्रेस व राष्ट्रवादीचा.

आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, औरंगाबादचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण आघाडीत सर्वसंमतीने केले जाईल, त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर लवकरच येईल असे सांगत आहेत. काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने वा मंत्र्याने आदित्य वा देसाई यांच्या दाव्याची पुष्टी केलेली नाही. मुस्लिम ही काँग्रेसची मोठी व्होटबँक आजही आहे. आज सगळीकडे काँग्रेसची शक्ती कमी होत असताना आणि एकेक जनाधार निघून जात असताना औरंगाबादचे संभाजीकरण करून मुस्लिम व्होटबँक काँग्रेस हातची गमावेल असे राजकीय जाणकारांना वाटत नाही. औरंगाबादचे संभाजीनगर करणे हा भावनिक मुद्दा आहे आणि शिवसेना ही नेहमीच भावनिक राजकारण करीत आली आहे. १३५ वर्षांचा इतिहास असलेली काँग्रेस अशा भावनिकतेमागे धावण्याची शक्यता नाही. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास काँग्रेस पाठिंबा देईल अशी शक्यता दिसत नाही. मुस्लिमांना नाराज करणारा निर्णय घेऊन हिंदुत्ववादी पक्ष अशी प्रतिमा तयार करण्याच्या भावनिक भानगडीत काँग्रेस पडेल असे वाटत नाही. शिवाय, शिवसेना हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष आहे. काँग्रेसला केरळपासून काश्मीरपर्यंतचे राजकारण, तेथील व्होटबँकेचाही विचार करावा लागतो.पश्चिम बंगाल, आसाम या तीस टक्के मुस्लिम मतदार असलेल्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे ठाकरे, देसाई कितीही दावा करीत असले आणि संजय राऊत यांनी काँग्रेसला साष्टांग दंडवत घातला तरी काँग्रेस भूमिका बदलेल असे वाटत नाही.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray),सुभाष देसाई (Subhash Desai) यांची भूमिका आणि सामनातील लेखावर रविवारी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून काँग्रेस कधीही औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास पाठिंबा देणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER