ईशा का गेली गोव्याला?

Isha Keskar

अभिनेत्री ईशा केसकरचे (Isha Keskar) तिच्या बाबांशी खूप बाँडिंग होतं. ते बापलेक कमी आणि मित्र-मैत्रिणी जास्त होते. ईशाच्या बाबांचं निधन झालं तेव्हा तिने बाबांसोबत असे अनेक इमोशनल फोटो सोशल मीडिया पेजवर शेअर केले होते. त्यानंतरही बरेच दिवस ती तिच्या बाबांच्या आठवणीमध्ये गुंतली होती. बाबांच्या जाण्याने तिला खूपच दुःख झालं होतं आणि ते स्वाभाविकही आहे. पण ईशाचे बाबा गेल्यानंतर आठवडाभरातच ती आणि तिची आई गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना दिसल्या होत्या. यावरून अनेकांच्या मनामध्ये प्रश्नांच्या लाटा उसळल्या होत्या की जर ईशा तिच्या बाबांशी इतकी जोडली गेली होती तर त्यांच्या निधनानंतर लगेच ती आणि तिची आई गोवा ट्रीपला का गेल्या ? पण याच गोष्टीचा खुलासा नुकताच ईशाने केला. तिने शेअर केलेला किस्सा खऱ्या अर्थाने तिच्या बाबांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे दाखवून देणारा आहे असेही तिने आवर्जून सांगितले.

सप्टेंबर महिन्यात ईशाच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आणि जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. काही दिवसातच इशाचे बाबा तिला कायमचे सोडून गेले. बाबांना ती बाबूस्की अशी हाक मारायची आणि म्हणूनच जेव्हा तिचे बाबा गेले तेव्हा बाबांसोबतचा एक भावूक फोटो तिने मिस यु बाबूस्की असं लिहून शेअर केला होता. त्यानंतर जेव्हा ईशा आणि तिची आई गोव्याला फिरायला गेल्या. एकीकडे ईशा तिच्या बाबांच्या आठवणीमध्ये दुःखी आहे आणि दुसरीकडे तिच्या बाबांना जाऊन पंधरा दिवसही झाले नाही तोपर्यंत ती गोव्याला ट्रीपला जाते या दोन्ही गोष्टींचा अर्थ तिच्या चाहत्यांना लागला नाही. यावरून अनेकदा ईशाला प्रश्नांनादेखील सामोरं जावं लागलं होतं.

इशा सांगते की, हो, बाबा गेल्यानंतर काही दिवसातच मी आणि आई गोव्याला फिरायला गेलो होतो पण त्याचं कारण जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्यामागची आमची भावना कळेल. जेव्हा आम्हाला कळलं की बाबाना कॅन्सर झाला आहे आणि ते दोन-तीन महिन्यांसाठीच आमच्यासोबत राहू शकतात. हे ऐकून आम्हाला तिघांनाही खरंच खूप धक्का बसला होता. मात्र बाबांनी कॅन्सरची बातमी अतिशय सकारात्मक घेतली. कॅन्सरचे रिपोर्ट घेऊन जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा बाबांनी मला सांगितलं की मी आयुष्यात खूप मजा केली आहे. व्यसने केल्यामुळे माझ्या शरीराचे आज हे हाल झाले आहेत ते मला स्वीकारले पाहिजेत. पण मी जितका वेळ तुमच्यासोबत आहे तितका वेळ मला आनंदी राहायचं आहे. माझ्यावर उपचार करून तुमचा वेळ ,पैसा आणि आशा खर्च करू नका आणि जर सुदैवाने मी बरा झालो किंवा मला आयुष्याने अजून काही वर्ष बोनस म्हणून दिली तर आपण सगळे मिळून गोव्याला फिरायला जाऊ या. मला समुद्रकिनाऱ्यावर माझ्या आयुष्यातला काही वेळ घालवायचा आहे.

बाबा आणि मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मी ठरवलं की थोड्या दिवसांनी आपण गोव्याला फिरायला जायचं पण दुर्दैवाने नियतीने बाबांना फार दिवस दिले नाहीत आणि जेव्हा बाबा गेले तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्यांचे कुठलेही विधी केले नाहीत. मात्र त्यांच्या मनात राहिलेली गोष्ट त्यांना द्यायची असं मी आणि माझ्या आईने ठरवलं. असं म्हणतात की माणसाचे निधन झाल्यानंतर दहा-बारा दिवस ती व्यक्ती आत्म्याच्या रूपाने आपल्या आसपास असते आणि म्हणूनच बाबांच्या जाण्यानंतर अगदी काही दिवसातच मी आणि आई गोव्याच्या समुद्र किनारी गेलो. तिथे गेलो म्हणजे याचा अर्थ आम्ही जिवाचा गोवा केला नाही तर आमची ट्रीप ही बाबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी होती. जेवढा वेळ आम्ही गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावर होतो तेवढा वेळ मी आणि आई बाबांच्या आठवणी एकमेकांशी शेअर करत होतो.आईने तिच्या बाबांच्या सहवासातील अनेक गोष्टी मला सांगितल्या. मी माझ्या मनातील बाबांच्या आठवणी आईसोबत शेअर केल्या. ते दोन-तीन दिवस जरी प्रत्यक्ष बाबा आमच्या दोघीबरोबर त्या समुद्रकिनाऱ्यावर नसले तरी त्यांच्या आठवणींच्या रूपाने ते आमच्यासोबत होते. बाबांची शेवटची इच्छा होती की समुद्रकिनारी फिरायला जावं आणि म्हणून आम्ही त्यांना आठवणींच्या रूपाने समुद्रकिनारा फिरवून आणला.

ईशाने हा किस्सा सांगितल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्या आणि तिच्या बाबांच्या नात्याला सलाम केला आहे. अनेकदा आपण आपल्या माणसांच्या इच्छा-आकांक्षा विचारत असतो पण आयुष्य कधीकधी त्या इच्छा पूर्ण करण्याची संधी देत नाही. अशावेळी माणसाच्या जाण्यानंतर सुद्धा आपण अशा वेगळ्या प्रकारे त्यांची इच्छा पूर्ण करू शकतो हे ईशाने एका वेगळ्या पद्धतीने दाखवून दिले आहे. खरेतर सुरुवातीला यावरून खूप टीका झाली झाली पण त्याकडे लक्ष न देता तिला एवढच माहीत होतं की ती जे करते ते तिच्या बाबांसाठी करत आहे. त्यामुळे बाबांच्या निधनानंतर लगेच गोव्याला गेली असं जर कोणी म्हणत असेल तर त्याकडे तिने दुर्लक्ष केलं आणि एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली तिने तिच्या बाबांना वाहिली.

जय मल्हार या मालिकेत बानू ही भूमिका साकारत ईशा केसकरने मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. त्यापूर्वी ती वेगवेगळ्या नाटकात काम करत होती. ती मुळची पुण्याची असल्यामुळे लहानपणापासूनच नाट्य वर्तुळामध्ये तिचा सहभाग होता. मालिकांमध्ये काम करण्यासाठी तिने मुंबई गाठली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत तिने साकारलेली शनायाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. अभिनेता ऋषी सक्सेना याच्यासोबत ईशा रिलेशनशिपमध्ये असून या दोघांचे फोटो ती सतत सोशल मीडिया पेजवर शेअर करत असते. प्रचंड फूडी असलेली ईशा स्वतः उत्तम सुगरणही आहे. ईशाची आई नोकरी करत असल्यामुळे लहानपणापासून ती तिच्या बाबांना आईला घरकामात तसेच स्वयंपाकात मदत करताना पाहत मोठी झाली आहे. त्यामुळे तिच्या आणि बाबांच्या अशा खास रेसिपी देखील होत्या ज्या रेसिपी ती आजही बाबा गेल्यानंतर आनंदाने करते आणि बाबाची आठवण काढून मनसोक्त खाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER