बिशनसिंग बेदी का संतापले, म्हणाले…मी अतिशय संयमी व सहनशील माणूस आहे पण…?

Bishansingh Bedi

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व नावाजलेले फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी (Bishansingh Bedi) हे आपल्या परखड मतांसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (DDCA) राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याच नाराजीतून त्यांनी डीडीसीएचे सदस्यपदसुध्दा सोडले आहे.

एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत तर डीडीसीएने फिरोझशहा कोटला स्टेडियमवरील (Kotla Stadium) एका स्टँडला दिलेले त्यांचे नाव यंदाच्या मोसमासाठी काढून घेण्याची सूचना केली आहे.

डीडीसीएची कार्यपध्दती व धोरणावर बेदी यांनी नेहमीच आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत. फिरोझशहा कोटला स्टेडियम परिसरात अलीकडेच एका राजकीय नेत्याचा पुतळा बसविण्यात आला. त्यावर त्यांनी आपली नाराजी प्रकट केली आहे.

फिरोजशहा कोटला स्टेडियम, जे आता अरुण जेटली स्टेडियम या नावाने ओळखले जाते, तिथे मोहिंदर अमरनाथ, विराट कोहली, गौतम गंभीर व बिशनसिंग बेदी यांच्या नावाने स्टँड आहे.शिवाय विरेंद्र सेहवाग व.अंजुम चोप्रा यांच्या नावाने प्रवेशद्वार आहे. मात्र, आता ताज्या घडामोडीत बिशनसिंग बेदी यांनी डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांना पत्र लिहुन म्हटले आहे की, जेटली स्टेडियममधील स्टँडला देण्यात आलेले आपले नाव काढून घ्यावे. यामागची कारणेही त्यांनी पत्रात लिहिली आहेत.

त्यांनी पत्रात म्हटलेय, “फिरोझशहा कोटला स्टेडियमचे घाईघाईने आणि अयोग्यरित्या कै. अरुण जेटली स्टेडियम असे नामकरण करण्यात आले त्यावेळी मला वाटले होते की कोटला स्टेडियमची पवित्रता कायम राखण्याची बुध्दी कशीतरी पदाधिकाऱ्यांना होईल परंतु माझा तो समज अतिशय चुकीचा होता.आता अरुण जेटली यांचा पुतळासुध्दा तेथे उभारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ही वार्ता माझ्यासाठी आनंददायी नक्कीच नाही. मी अतिशय संयमी व सहनशील माणूस आहे पण..हे गूण राखणे आता अवघड झाले आहे. डीडीसीएने माझ्या संयमाची परीक्षा चालवली आहे आणि मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. म्हणून महोदय अध्यक्ष, माझी तुम्हाला विनंती आहे की, स्टेडियममधील एका स्टँडला दिलेले माझे नाव तत्काळ काढून घ्यावे. यासोबतच डीडीसीएच्या सदस्यत्वाचाही मी त्याग करत आहे.”

बिशनसिंग बेदी यांचे दिल्लीच्या क्रिकेटसाठी फार मोठे योगदान आहे. 1968 ते 1981 दरम्यान त्यांनी दिल्लीचे प्रतिनिधीत्व केले आणि या काळात रणजी स्पर्धेत दिल्लीचा संघ मुंबईच्या संघाच्या तोडीसतोड होता. 1976 ते 1981 दरम्यान त्यांनी सलग रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 1978-79 व 1979-80.मध्ये ते विजेतेसुध्दा ठरले होते. दिल्लीने पहिल्यांदाच रणजी विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 80 च्या दशकातही दिल्लीने तीन वेळा रणजी विजेतेपद पटकावले त्यात बेदी यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER