राष्ट्रवादीविरुद्ध आक्रमक का होत नाही काँग्रेस?

Congress-NCP

काँग्रेस (Congress)ही १३५ वर्षांची म्हातारी आहे. वटवृक्ष म्हणा हवं तर. वटवृक्षाची पाळमुळं खूप दूरपर्यंत पसरलेली असतात आणि मजबूत असतात. असे म्हणतात की वटवृक्ष अमर आहे. काँग्रेसचेही तसेच आहे. १३५ वर्षांत या पक्षाला अनेक धक्के बसले पण तो संपला नाही. या पक्षाला संपविण्याचे अनेकानेक प्रयत्न आसेतुहिमाचल झाले. काँग्रेसमुक्त भारताचा नाराही देण्यात आला. मात्र, आजही काही राज्यांमध्ये काँग्रेस तग धरून आहे. नेतृत्व नसलेल्या फौजेसारखी पक्षाची आज अवस्था आहे पण तरीही लोकांमधील काँग्रेस जात नाही. दुर्देवाने या पक्षातील अनेक नेते आज हतबल, नाऊमेद झालेले दिसतात. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती दिसते. परवा भिवंडी महापालिकेतील (Bhiwandi Mahapalika) काँग्रेसच्या १६ नगरसेवकांना राष्ट्रवादीने (NCP) फोडले. काँग्रेसने त्यावर आक्रमक प्रत्युत्तर द्यायला हवे होते. मात्र, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक टिष्ट्वट केले.

‘राज्य सरकारमध्ये मित्र असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेस नगरसेवकांना आपल्यात घेऊन चुकीचा पायंडा पाडला आहे. या बाबत काँग्रेस नेतृत्वाने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केलेली आहे’ असे ते टिष्ट्वट होते. राष्ट्रवादीच्या या पळवापळवीबद्दल ना अशोक चव्हाण (Ashok Chavan) बोलले ना बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीला फैलावर घेतले. एरवी आक्रमकपणे बोलणारे नितीन राऊत यांनीही या विषयावर तोंड उघडले नाही. काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही आणि पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत तेवढे बोलतात. याचा अर्थ काँग्रेसचे आणखी लचके उद्या तोडले तर काँग्रेस फारशी आक्रमकपणे प्रतिक्रिया देणार नाही हे लक्षात आल्याने राष्ट्रवादीची आणखी हिंमत वाढेल आणि काँग्रेसमधून माणसांच्या पळवापळवीला वेग दिला जाईल.

‘यापुढे काँग्रेसच्या कोण्या कार्यकर्ते/नेत्याला फोडण्याचा प्रयत्न केला तर सरकारच्या स्थैर्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असा धमकीवजा इशारा जरी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिला असता तर पुढच्या वेळी काँग्रेसची माणसं फोडताना राष्ट्रवादीला दहावेळा विचार करावा लागला असता. मात्र, राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आक्रमकतेचा अभाव आहे. बाळासाहेब थोरात यांचा आक्रमकतेशी दूरदूर तक संबंध नाही. थोरात प्रदेशाध्यक्ष असताना मी का म्हणून बोलायचे असा अशोक चव्हाण यांचा विचार असू शकतो. नाना पटोलेंसारखा आक्रमक नेता विधानसभाध्यक्ष झाल्याने राजकीय विषयावर टीकाटिप्पणी, वाद करणे वा राष्ट्रवादीला सुनावणे त्यांना शक्य नाही. पदामुळे त्या बाबत त्यांना मर्यादा येतात. अरे ला कारेने उत्तर देण्याची ताकद असलेला आणि कोणतेही दडपण न मानता बिनदिक्कत व्यक्त होऊ शकेल अशा नेत्याची कमतरता प्रदेश काँग्रेसमध्ये दिसते. लोकांच्या मनात आजही काँग्रेस आहे पण काँग्रेसचे नेतृत्व हे शक्तीची जाणीव हरपलेल्या हनुमानासारखे झाले आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांचे लक्ष्य हे भाजप आहे. आज महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीन पक्ष विरुद्ध भाजप असे चित्र वरवर दिसते. पण बारकाईने राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन काँग्रेसला अधिकाधिक शक्तिहिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पक्ष विस्तारासाठी लक्ष्य घालून दिलेले असते. त्यासाठी तन-मन-धनाने पूर्ण तयारीनिशी उतरा असे त्यांना बजावून सांगितले जाते. काँग्रेसच्या मंत्र्यांना असे बजावून सांगणारी अ‍ॅथॉरिटी पक्षात नाही. राज्यातील चवथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या प्रदेश काँग्रेसला आक्रमक अध्यक्ष मिळत नाही तोवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेसची माणसे फुटत राहतील. सत्तेचा फायदा पक्षवाढीसाठी करून घेण्याचा चांगला गुण हा राष्ट्रवादीमध्ये आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हा गुण त्यांच्याकडून घेण्याची गरज आहे.

ही बातमी पण वाचा : अशी ही पळवापळवी : भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER