पुत्र मोह सोडा, सोनिया गांधींना जेष्ठ नेत्याचा सल्ला

Sonia Gandhi - Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्ष आणि लोकशाहीच्या बचावासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पुत्र मोह सोडावा लागेल, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी (Shivanand Tiwari) यांनी केले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह बाजूला सारुन काँग्रेस पक्षाला वाचवले होते. मात्र, आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावले उचलायला हवे, असे तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वक्षमता नाही’

दिल्लीत शनिवारी काँग्रेसमधील नाराज नेते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवानंद तिवारी यांनी फेसबुक पोस्ट करून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या बैठकीअंती काय निर्णय घेतला जाणार, हे सर्वश्रुत आहे. मात्र, सध्या काँग्रेसची नौका चालवायला सक्षम नेतृत्त्व नाही.

राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचे शिवानंद तिवारी यांनी म्हटले.

‘सोनिया गांधी काँग्रेसचा गाडा हाकत आहेत’

शिवानंद तिवारी यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. प्रकृती व्यवस्थित नसूनही सोनिया गांधी कशाबशा पक्ष हाकत आहेत. मला त्यांच्याविषयी आदर आहे. सीताराम केसरी यांच्या काळात काँग्रेस पक्ष डबघाईला आला होता. अशा परिस्थितीत सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेऊन पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवले, याची आठवण तिवारी यांनी करुन दिली आहे.

2004 साली काँग्रेस पक्षाला सोनियांच्या नेतृत्त्वाखाली बहुमत मिळाले होते. त्यामुळे सोनिया गांधी या पंतप्रधानपदाच्या नैसर्गिक दावेदार होत्या. मात्र, त्यांनी पंतप्रधानपदाचा मोह टाळणे ही अनन्यसाधारण घटना होती. याच पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी आपल्या देशातील दोन बड्या नेत्यांनी काय नाटकं केली होती, हे सर्वांना माहिती असल्याचेही तिवारी यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER