चहलने दीपक चहरला ‘बेशरम’ का म्हटले?

Sports News

युझवेंद्र चहल आणि दीपक चहर हे भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी. दोन्हीही जवळपास समवयीन, दोन्ही गोलंदाज आणि दोन्हीही भारतीय संघात. त्यामुळे त्यांच्यात दोस्ती असणे गृहितच. नाही दोस्ती तर दोघांत किमान चांगले संबंध असणे तर अपेक्षितच. पण या समजाला परवा तडा गेला जेंव्हा युझवेंद्रने नागपूर येथे दीपक चहरला चक्क ‘बेशरम’ असे संबोधले. तेसुध्दा त्याच्यासमोर..चहल म्हणाला ,” बडे बेशरम आदमी हो यार”.

चहलकडून अशी अपेक्षा कुणालाच नव्हती त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि चहलने चहरला बेशरम म्हणावे असे काय घडले असावे याचा विचार करत बसले. चहलने का बरे दीपकला बेशरम म्हटले असावे? याचा शोध घेतला असता हसू तर आवरले गेले नाहीच आणि नाराजीसुध्दा कुठल्या कुठे पळाली आणि बेशरम म्हणणाऱ्या चहलचे उलट कौतुकच झाले.

ही बातमी पण वाचा : टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी पहिली हॅट्ट्रिक चहरची नाही तर कुणाची?

झाले असे की, नागपूरच्या टी- 20 सामन्यात दीपक चहरने हॅट्ट्रिकसह 7 धावात 6 बळी अशी विश्वविक्रमी सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवली आणि हे करताना जागतिक पातळीवरचा श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसचा विक्रम तर त्याने मोडलाच, शिवाय भारतातर्फे असलेला टी-20 मधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी युझवेंद्र चहलचाही विक्रम मोडला, तोसुध्दा त्याच्या डोळ्यादेखत.

युझवेंद्रने 2017 मध्ये इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात आपल्या लेगस्पिनने 25 धावात सहा बळी मिळवले तर चहरने फक्त सात धावातच सहा बळी मिळवले. त्यामुळे आपल्या समोरच आपला विक्रम मोडल्याचा युझवेंद्रचा हा गमतीशीर संताप होता आणि त्यापायी गमती गमतीनेच त्याला दीपक चहरला ‘बडे बेशरम आदमी हो यार’ असे म्हटले होते. आपल्या चहल टीव्ही या बीसीसीआयसाठी मुलाखतींच्या चॅनेलसाठी श्रेयस अय्यरसोबत दीपकची मुलाखत घेताना युझवेंद्रने सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ही गंमत केली. बीसीसीआयने या गमतीशीर मुलाखतीचा व्हिडीओच शेअर केला आहे.

या मुलाखतीसाठी दीपक चहरची ओळख करुन देताना चहल म्हणाला की, या माणसाच्या गोलंदाजीबद्दल काय बोलावे. आज मेरा ही रिकार्ड तोड दिया.बडे बेशरम आदमी हो यार तूम. जोक्स अपार्ट, मला आनंदच आहे. तुम्ही घरी बसल्याबसल्यासुध्दा कल्पना करु शकत नाही की, टी- 20 सामन्यात फक्त सात धावात तुम्ही सहा बळी मिळवाल. दवाच्या समस्येवर कशी मात केली या प्रश्नाच्या उत्तरात दीपक म्हणाला की, थोडा ओलसरपणा असल्याने गतीत बदल करणे जरा अवघड गेले पण चेन्नईत खेळल्याच्या अनुभवाचा फायदा झाला. तिथे दवसुध्दा असते आणि घामसुध्दा येत असतो. त्यामुळे माती वापरुन हात सुकवण्याची कला मी अवगत केली आहे.