कोणाचेही प्यादं बनून राहू नका, निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हा, बदल घडवा: राज ठाकरेंचे महिलांना आवाहन

Raj Thackeray-International Womens Day

मुंबई : आज जगभरात जागतिक महिला दिन (International Womens Day) साजरा होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत आपले रोखठोक मत मांडले आहे.

‘आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.

आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे’ असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले .

मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही’ असे मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केले .

राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता, असे म्हणत राज ठाकरे यांनी सर्व महिलांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER