टेनिसपटू पेत्रा क्वितोव्हाच्या डोळ्यांत अश्रू का तरळले?

petra kvitova

झेक गणराज्याची (Czech Republic) महिला टेनिसपटू पेत्रा क्वितोव्हा (Petra Kvitova) ही फ्रेंच ओपनच्या ( French Open) क्वार्टर फायनलमध्ये पोहचली आहे आणि यानिमित्ताने ती अतिशय भावनावश झाली आणि मोठ्या मुश्किलीने तिने आपले अश्रू आवरले. याचे कारण असे की २०१२ नंतर प्रथमच ती या स्पर्धेत एवढ्या पुढे आली आहे आणि २०१७ मध्ये झालेल्या चाकूहल्ल्यानंतरचे तिचे हे उल्लेखनीय यश आहे.

२०१७ मध्ये पेत्राच्या घरीच चोरट्यांनी तिच्यावर हल्ला केला होता आणि तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांतच ती त्या वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये खेळली होती. त्या सर्व आठवणी जाग्या झाल्याने आपण भावनावश झाल्याचे या ३० वर्षीय खेळाडूने म्हटले आहे. हा फार खडतर प्रवास होता असे ती म्हणते. डिसेंबर २०१६ मध्ये तिच्या झेक गणराज्यातील घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता आणि त्यांच्याशी झालेल्या झटापटीत तिच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर जखमा झाल्या होत्या आणि तिला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ती डावखुरी खेळाडू असल्याने यामुळे तिचा खेळच धोक्यात आला होता. दोन वेळच्या या विम्बल्डन विजेतीला पुन्हा खेळता येणे अवघडच असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. पण त्यानंतर मार्चमध्येच तिने हाती रॅकेट धरली होती.

सोमवारी तिने चौथ्या फेरीच्या सामन्यात चीनच्या झँग शुआई हिला ६-२, ६-४ अशी मात दिली. या सामन्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये ती भावनावश झालेली दिसली. सामन्याच्या अखेरच्या दोन गुणांवेळी तिच्या डोळ्यांत अश्रू होते. ते यासाठी होते की त्या गंभीर दुखापतीनंतर २०१७ मध्ये याच स्पर्धेत तिने पुनरागमन केले होते. त्यानंतर आपण ग्रँड स्लॅमच्या पुन्हा क्वार्टर फायनलपर्यंत पोहचू शकू असे वाटले नव्हते म्हणून ती भावनावश झाली होती.

या काळात मला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते माझे कुटुंबीय, माझे मित्र आणि माझे चाहते यांचा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्याचे कारण मला सांगता येणार नाही; पण फिलीप चार्टीयर स्टेडियमवर मी त्यांना पाहिले आणि स्वतःला रोखू शकले नाही, असे तिने म्हटले आहे. यंदा या स्पर्धेत तिने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. तिचा पुढचा सामना आता लाॕरा सिगमंड हिच्याशी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER