मराठी माध्यमांच्या शाळांची बाजू अजूनही लंगडी का ?

Marathi Schools

शिक्षणासाठी (Education) कुठले माध्यम निवडावे हा प्रत्येक पालकाला पडणारा प्रश्न असतो .मुलांना शाळेत घालताना आपला अनुभव ,इतरांशी होणारी चर्चा ,चांगल्या शाळांचा शोध, शिक्षण तज्ञांची मत तसेच अनेक तज्ञांचे प्रबंध या विषयावरची मत जाणून घेऊन आत्ताचे पालक निर्णय घेतात.

मातृभाषेतून शिक्षण हे महत्त्वाचे असून ,यशासाठी आणि संकल्पना पक्क्या होण्यासाठी हेच गरजेचे आहे ,असे शिक्षणतज्ञ, शाळा महाविद्यालयांचे संचालक ,अनेक यशस्वी व्यक्ती, समुपदेशक हे परत परत सांगत असतात आणि आहेत.
मग दरवेळी हा प्रश्न पडतोच का? आणि प्रत्यक्षात मराठी शाळांना (Marathi schools) विद्यार्थ्यांच्या अभावामुळे लहान खेड्यापासून मुंबई पुण्यापर्यंत टिकाव धरणे अवघड जातं. असं का ? मराठी माध्यमांची ही स्थिती अशीच राहण्यामागे काय काय कारणे असू शकतात? यासंबंधी विचार केला गेला तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या.

स्वतः इंग्रजी माध्यमात शिकलेले असले तर प्रश्नच नसतो .ते इंग्रजी माध्यमावर ठाम असतात आणि मराठी माध्यमाचा विचारही करीत नाही. मराठी माध्यमातून शिकलेल्या पालकांनाही माध्यम बदलताना पुढच्या वर्गांमध्ये त्रास झाला असेल तर तो आपल्या मुलांना होऊ नये अशी त्यांची इच्छा असते .सुरुवातीपासून इंग्रजी शिक्षण असेल तर इंग्रजी शब्द शिकण्याची धडपड ,स्पेलिंग पाठांतर करावे लागत नाही .इंग्रजीतून आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतो हे महत्त्वाचे!कॉलेजमध्ये मुलांना विषय चांगला समजला असला तरी तो योग्य पद्धतीने मांडता येत नाही असे काही प्राध्यापकांचे अनुभव सांगतात .पुढे अकरावी-बारावीच्या प्रवेश परीक्षांची तयारी करतानाही ही उणीव जाणवते.

अक्षरश: ग्रामीण भागातील अशिक्षित पालक सुद्धा, आपल्यासारखे आयुष्य मुलांचे होऊ नये असे वाटून दहा दहा किलोमीटरवरील इंग्रजी शाळेत मुलांना घालतात व वाहन व्यवस्थाही पुरवतात. रोजगार व पोटापाण्याच्या उद्योगासाठी शिक्षण आवश्यक आहेच .पण त्याचबरोबर प्रगल्भता आणि व्यवसायासाठी लागणारी कार्यक्षमताही गरजेची असते याकडे मात्र दुर्लक्ष होतं.

मराठी शाळांचा दर्जा व सुविधा याबद्दल अनेक पालकांमध्ये असमाधान दिसतं. शिक्षणात नवीन पद्धतींचा अवलंब केल्या जात नाही .प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊ शकणारी प्रयोगशील शाळा हवी असते .बहुतेक शाळा अनुदानित असतात .त्यांना सतत पैशाची असणारी गरज निधी वेळेवर न मिळाल्यामुळे पूर्ण होत नाही. अर्थातच नवीन काही करायचं शक्य होत नाही. प्रोजेक्टर्स ,चांगली स्वच्छतागृहे वगैरे. शिक्षक किंवा शाळा जेव्हा मराठी माध्यमाचे महत्व सांगायला जातात, प्रबोधनाचा प्रयत्न करतात त्यावेळी पालकांना वाटतं की ते आपली शाळा चालावी म्हणून हे सांगत आहेत.

समाजाची मानसिकता ही मराठी माध्यमांना असणारा खूप अडसर आहे .दोन वाक्य इंग्रजीतून बोलला तर तो माणूस विद्वान. पण हेच जर मातृभाषेतून बोलला तर त्याला फार काही समजत नाही ही लोकांची धारणा आहे. अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याने आजुबाजुची नातेवाईकांची मुले इंग्रजी माध्यमात जात असल्याने तिथेही आपल्या पाल्याला कमीपणा वाटू नये असाही विचार पालक करतात.

संस्कृती जपणारा ज्ञान देण्यावर मराठी शाळांचा फोकस असतो .तर इंग्रजी शाळांमधून ग्लोबलायझेशनच्या पातळीवर जाण्यासाठी ज्ञान पुरवले जाते. म्हणजे बरेचदा तिथे दाखविले जाणाऱ्या ,उत्तम ,दर्जेदार, विविध भाषांमधील आणि इंग्रजी सबटायटल असणाऱ्या मुव्हीज या पालकांपूर्वी मुले बघतात .लायब्ररी हीसुद्धा व्यापक विषयांशी संबंधित असते. हा पण एक मुद्दा आहे.

कुठल्याही शास्त्रातील अद्ययावत साहित्य सामग्री आज इंग्रजीतच उपलब्ध आहे .त्याचे मराठी भाषांतर नाही .असले तरी परिपूर्ण नाही. किंवा बरेच वेळा ते शब्द जास्त किचकट असतात. कुठल्या बोर्डात प्रवेश द्यावा याबाबत ही पालकांमध्ये दुमत आहे .

पण असे जरी असले तरी त्यासाठी काही उपाय योजनाही आहेत. पारंपारिक पद्धतीने शाळा चालविण्यासाठी अडचणी येत असल्या तरी बऱ्याच शाळा आज हे आव्हान समर्थपणे पेलत आहेत. कालानुरुप शिक्षण व कृतिशील शिक्षण पद्धतीचा अवलंब त्या करतातच पण शाळेचा मुख्य घटक म्हणजे विद्यार्थी व त्यांचे पालक या दोघांनाही त्यांनी समान महत्त्व दिले आहे .उदाहरणार्थ काही ठिकाणी पालक दिन हा उपक्रम राबविला जातो त्यामध्ये पालक शाळा चालवून बघत मुलांचे खेळ अभ्यासा सकट शाळेशी समरस होताना शाळेसमोरील अडचणी त्यांना समजत जातात.

अगदी सुरुवातीला विद्यार्थी लहान वयामध्ये शाळेत जातो त्यावेळी त्याला होमली टच हवा असतो हा घर पणा चा अनुभव त्यांना तीन-चार वर्षाच्या व यामध्ये शाळेविषयी ची भीती दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यादृष्टीने अजुन आजूबाजूचे आजी-आजोबा त्यांना उपलब्ध करून दिले जातात याशिवाय लेखन वाचनाची घाई न करता सहज व आनंददायी शिक्षणाचा अवलंबिल्या शाळा करतात.

प्रत्येक उपक्रमांमध्ये शिक्षकांचे सहकार्य आणि सहभाग आखणी आणि अंमलबजावणी मध्ये शिक्षकांनी मोकळेपणी मते मांडण्यावर भर दिलेला असतो म्हणूनच उपक्रमांवर ते तन्मयतेने परिश्रम घेऊ शकतात . विश्वस्थ लोकां बरोबरचा मनमोकळा वैचारिक देवाणघेवाणीचा सहभाग विचार प्रत्यक्षात उतरण्यासाठी उपयोगी ठरतो.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये खेळांपासून सगळ्या गोष्टींची उत्तम सुविधा असते .अभ्यास बरोबर प्रोजेक्टर ,व्हाईट बोर्ड, उत्तम सुसज्ज आणि स्वच्छ ,स्वच्छतागृह .पूर्व प्राथमिक शाळेतील आकर्षक खेळणी ,सुंदर रंगीत फर्निचर, फ्लॉवरिंग ,वायरिंग ,डिस्प्ले बोर्ड ,रंग त्यावरची सजावट, थीम्स प्रमाणे दर आठवड्याला त्यात होणारा बदल, तसेच गणवेश अत्यावश्यक असून टाय ,शूज, सॉक्स ह्या गोष्टी अशिक्षित पालकांनाही आकर्षित करतात .आणि सुशिक्षितांना ही काही गोष्टी हव्या असतात.

पण प्रश्न येतो तो निधींच्या उपलब्धतेच्या शाळेच्या नूतनीकरणास किंवा आधुनिकीकरणात मध्ये मोठा वाटा जर माजी विद्यार्थ्यांनी उचलला एकत्र येऊन एक एक वर्ग जर दत्तक घेतला तर हे सहज शक्य होते माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो.

इंग्रजी शाळेचे शाळांचे शुल्क लावायला सुद्धा सज्ज असणारे पालक मराठी शाळांबाबत सढळ हाताने शुल्क भरायला तयार होत नाहीत.

खरंतर मराठी भाषेच्या अंगाने विचार करणारेही अनेक पालक असतात .मोठ्या शहरातून मुलांच्या कानावर इंग्रजी कुठल्या ना कुठल्या निमित्त्याने पडत असते .त्यामुळे मूल संस्थेने इंग्रजी शिकते.

स्टेट बोर्डाच्या इतर बोर्डांच्या शाळेत मुले अभ्यासात पार बुडून जाऊन त्यांच्या अभ्यासक्रमाच्या काठिण्यपातळी मुळे ट्युशन क्लासेस मध्येही अडकून जातात. तिथे स्पर्धा ,चढाओढ यांनाही तोंड द्यावेच लागते. त्यामुळे रॅट रेस मध्ये अडकतात.
इतर गायन ,अभिनय या क्षेत्रात वावरताना पुरेसा वेळ आवश्यक असतो. प्रयोगशील शाळांमधून ही मुले वेगळा विचार करायलाही शिकतात .अभिनयक्षेत्रात नाट्य संहितेचे वाचन ,वाचिक अभिनय हे करताना इंग्रजी माध्यमांच्या अनेक मुलांची परिस्थिती कुठलीच भाषा धड येतं नाही अशी असते. मराठी नीट वाचता येत नाही ,इंग्रजी वाचता येतं पण व्यक्त होता येत नाही. मराठी भाषेतून भाषेचे बारकावे व्यवस्थित करून व्यक्त होणे सोपे जाते.

खरं तर लहान वयामध्ये मुले अनेक भाषा लीलया शिकू शकतात .बरेच लोक मराठी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर मुलांची मित्रमंडळी सर्व स्तरातील असतील म्हणूनही मराठी माध्यम नाकारतात. परंतु मुले नंतर बाहेरच्या जगात वावरणार असतात .अशा वेळी त्याची सवय त्यांना आत्तापासून होणे आवश्यक असते. त्यातून खरं तर मुले प्रत्यक्ष “जीवन जगण्याची कला “शिकत असतात.

मराठी माध्यमांचा असे सर्वांग दृष्टीने महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणनाच्या दुनियेमध्ये आज फेसबुक, वर्तमानपत्र आणि इतर माध्यमांचा कुशलतेने वापर करून घ्यायलाच हवा.

शिक्षक-पालक समाजातील इतर व्यक्ती यांच्यासाठी समुपदेशनातून पण हे प्रबोधन करता येईल.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER